काळदुर्ग किल्ला (Kaldurg Fort) | पालघर | Trek Blog | Palghar | Sahyadri Bhatkanti

थोडक्यात माहिती

जिल्हा - पालघर
दिनांक - 11 जानेवारी 2020
पायथ्याचे गाव - वाघोबा मंदिर (Waghoba Temple, Palghar)
उंची (Height) - 1500 फूट
वेळ (पायथा ते गडमाथा) - 1 तास
श्रेणी (Grade) - सोपे
सहनशक्ती पातळी (Endurance level) - कमी
प्रवास - अंधेरी स्थानक ते पालघर स्थानक - लोकल रेल्वे डहाणू फास्ट
            पालघर स्थानक ते वाघोबा मंदिर - टमटम किंवा एसटी बस

Kaldurg fort palghar

ट्रेकची योजना (Trek plan)

पालघर जिल्ह्यात अनेक किल्ले आहेत, त्यापैकी प्रसिद्ध अश्या डोंगरी किल्ल्यांमध्ये अशेरीगड किल्ला (Asherigad fort, कोहोज किल्ला (Kohoj fort), काळदुर्ग किल्ला (Kaldurg fort), असावा किल्ला (Asawa fort) आणि तांदूळवाडी किल्ला (Tandulwadi fort) यांचा समावेश होतो. हा आमचा पालघर जिल्ह्यातील पहिलाच ट्रेक आणि काळदुर्ग किल्ला निवडण्याचे कारण म्हणजे आमच्या सोबत ह्यावेळी काही नवखे ट्रेकर होते, त्यामुळे सोपा श्रेणी व सहनशक्तीचा ट्रेक करायचा होता. ह्या व्यतिरिक्त ट्रेकचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण ट्रेक मार्ग हा घनदाट जंगलातून आहे त्यामुळे उन्हाचा देखील त्रास होणार नव्हता व जंगल ट्रेकचा आनंदही घेता येणार होता. ट्रेक वाघोबा मंदिरापासून चालू होतो व अगदी एका तासाच्या आत आपण गडमाथ्यावर पोहचतो. आणि ह्याच मार्गाने परत यायचे होते. म्हणजे निव्वळ दोन ते अडीच तासात आपण संपूर्ण ट्रेक संपवू शकता. 

पायथ्याच्या गावी कसे पोहचाल ? (How to reach base village?)

पश्चिम रेल्वेच्या कुठल्याही स्थानकावर आपण पोहचा व तेथून पालघरसाठी ट्रेन पकडा. पालघर डेपो मधून मनोर/वाडा कडे जाणारी एसटी बस किंवा स्थानकाबाहेरील टमटम आपणास वाघोबा मंदिराला घेऊन जाईल जे कि फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे. 

waghoba temple
वाघोबा मंदिर
               
आम्ही अंधेरी स्टेशनला रिक्षाने पोहचलोत व डहाणूसाठीची पहिली लोकल ५:३० वाजता आम्हाला मिळाली. सातच्या दरम्यान आम्ही पालघरला उतरलोत व पालघर पश्चिमेला येऊन आम्ही डहाणूच्या दिशेने पाच-सात मिनिटे चालत गेले असता डावीकडे डेपो मिळाला. लोकल ट्रेन व एसटी बस सकाळच्या वेळेस अर्ध्या एक तासाच्या अंतराने सहज मिळते. अगदी पंधरा मिनिटातच बसने आम्हाला वाघोबा मंदिराला पोहचवले.                 

ट्रेकला सुरुवात

बस मधून उतरताच माकडे आपले स्वागत करतात. इतकी माकडे एकसोबत पहिल्यांदाच पाहिली होती आम्ही. उतरल्यावर उजवीकडे वाघोबा मंदिर आहे व मंदिराच्या उजवीकडून ट्रेकचा मार्ग आहे. देवाचे दर्शन घेतले व पाण्याची बाटली तेथील हाफश्याकडे भरून आम्ही ८ वाजता ट्रेकला सुरुवात केली. मार्ग पूर्णपणे घनदाट जंगलातून असून मार्ग चुकण्याची शक्यता नाही. 

Jungle trek to kaldurg fort
घनदाट जंगलातून ट्रेक मार्ग 

ट्रेक चालू होताच काही अंतरावरच आपण डावीकडे वळतोत. मार्ग हा बराच नागमोडी वळणाचा व मंद चढ असलेला आहे. ४० मिनिटाच्या ट्रेकनंतर आम्ही पठारावर पोहचलोत जेथून गडमाथा सहज पाहिला जाऊ शकतो. 

Kaldurg fort

थोडीशी विश्रांती घेऊन परत ट्रेकला सुरुवात केली. येथून गडाच्या दिशेने म्हणजेच थोडे डावीकडे वळून हा मार्ग आपल्याला पंधरा मिनिटातच गडाच्या मागे घेऊन जातो. हा ट्रेकचा सर्वात महत्वपूर्ण टप्पा आहे.

Kaldurg fort
गडमाथा

येथून उजवीकडे एक छोटासा सुळखा आहे जेथून आपण गडाला पाहू शकता आणि सरळ चढत गेले असता काही क्षणातच आपण गडावर पोहचतो. चढ थोडा तीव्र व सरकती माती यामुळे सांभाळून जावे. झाडांमुळे उन्हापासून वाचता आले असले तरी फुल पॅन्ट न घातल्यामुळे टोकदार व काटेरी रोपट्यानी पायांना त्रास झाला.

गडाचे महत्त्व व भेट देण्याची ठिकाणे (Importance and places to visit on Kaldurg fort)

गडाचा माथा चौकोनाकृती असल्यामुळे जवळपासच्या ठिकाणावरून गड सहज ओळखला जातो. अर्ध्या एकरापेक्षा ही लहान गडमाथा असून टेहळणीसाठी गडाचा उपयोग होत असावा. गडावर दोन पाण्याच्या टाक्या आहेत व पाणी पिण्यायोग्य नाही. एक टाकी गडावर पोहचण्याच्या काही पाऊले आधी उजवीकडे तर दुसरी टाकी गडमाथ्यावर आहे. पाण्याच्या टाक्या व गडमाथ्यावर जाण्यासाठी काही पायऱ्याही एवढेच मानवनिर्मित काम गडावर असून गडाचा आकार ही सह्याद्रीची वैशिट्यपूर्ण वास्तुकलाच म्हणावी लागेल. गडाच्या पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस देवखोप धरण व त्यामागे असावा किल्ला, ईशान्येस अशेरीगड, पूर्वेला समांतर वाहणारी सूर्या नदी व त्यामागे कोहोज किल्ला आणि दक्षिणेला काही डोंगराची रांग व तांदूळवाडी किल्ला आहे. वातावरण स्वछ असल्यास वरील नमूद केलेल्या बऱ्याच ठिकाणांना पाहता येते. गडमाथा लहान असला तरी आपल्याकडे टेन्ट असेल तर आपण येथे रात्री राहू शकता.

Kaldurg fort palghar

परतीचा प्रवास

आजूबाजूच्या ठिकाणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळ आम्ही गडावर विश्रांती घेऊन १० वाजता परतीच्या प्रवासाला लागलोत. गडाकडे व गडावरून पायथ्यासाठीचा एकच मार्ग आहे. मार्ग तर सोपा व सावलीतून होता पण जातेवेळेस जसे पायांचे हाल तशेच आता हे होत होतेच. असो, पण अगदी अर्ध्या तासातच आम्ही वाघोबा मंदिराकडे पोहचलोत. आता तर सकाळपेक्षाही जास्त माकडे होती, त्यामुळे बस किंवा टमटम भेटेपर्यंत त्यांना सहन करण्याखेरीज उपाय नाही.  करायचे फक्त एवढच कि हातात मोबाईल किंवा खायची कुठलीही वस्तु नसावी व आपले सामान जमिनीवर ठेवायचे नाही. वीस मिनिटाने आम्हाला टमटम मिळाली व पुढील काही मिनिटात पालघर स्टेशनला पोहचलोत. येथून चर्चगेट लोकल व नंतर मेट्रोने प्रवास करत, अडीच वाजता आम्ही आमच्या घरी पोहचलो. 

उपयुक्त टिप्स
  • माकडापासून सावधान. हातात मोबाईल किंवा खायची कुठलीही वस्तु नसावी व आपले सामान जमिनीवर ठेवायचे नाही.
  • जंगल ट्रेकचा उत्तम अनुभव आपल्याला इथे मिळेल.
  • नवखे ट्रेकर व कुटुंबासोबत हा ट्रेक आपण करू शकता.
  • पावसाळ्यात शेवटचा टप्पा ट्रेक करताना सावधगिरी बाळगा.
  • पुरेसे पाणी सोबत असावे कारण गडावर पाण्याची कुठलीही सोय नाही.
  • आपल्याकडे टेन्ट असेल तर आपण येथे राहू शकता पण पुरेसा अन्नपाण्याचा साठा असावा.
  • जवळपास सर्व मार्ग घनदाट जंगलातून असल्याने तो आपणास उन्हापासून वाचवतो पण पायात फुल पॅन्ट असणे गरजेच.
पालघर जिल्ह्यातील अन्य भटकंती ब्लॉग वाचण्यासाठी पालघर येथे क्लिक करा.

#kaldurgfort #palghar #treksnearmumbai #waghobatemple #sahyadribhatkanti #treksnearthane #easytreks 

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu