तांदुळवाडी किल्ला | Tandulwadi Fort trek | Palghar | संपूर्ण माहिती | Sahyadri Bhatkanti

थोडक्यात माहिती

ठिकाणफाळे (Saphale), पालघर   

तारीख: ११ जानेवारी २०२०   

पायथ्याचे गावतांदूळवाडी (Tandulwadi village) आणि लालठाणे (Lalthane village) गाव 
  
समुद्रसपाटीपासून उंची: १५२४ फूट   

वेळ (पायथा ते किल्ला): २ तास   

खर्चः १५० रू. प्रति व्यक्ती (मुंबई, अंधेरी)  
 
श्रेणी (Grade) लालठाणे गाव मार्गे सोपे आणि तांदूळवाडी गाव मार्गे मध्यम   

सहनशक्ती पातळी (Endurance level): मध्यम  


tandulwadi fort, palghar
तांदुळवाडी किल्ला

पालघर जिल्ह्यात 
अनेक किल्ले आहेत, त्यापैकी प्रसिद्ध अश्या डोंगरी किल्ल्यांमध्ये अशेरीगड किल्ला (Asherigad fort), कोहोज किल्ला (Kohoj fort), काळदुर्ग किल्ला (Kaldurg fort), असावा किल्ला (Asawa fort) आणि तांदुळवाडी किल्ला (Tandulwadi fort) यांचा समावेश होतो. खाली छायाचित्रात पालघर जिल्ह्या मधील काही प्रसिद्ध किल्ले चिन्हांकित केले आहेत.

पालघर किल्ले
पालघर जिल्हा मधील काही प्रसिद्ध किल्ले

ट्रेक योजना (Trek plan)

गेल्या आठवड्यात आम्ही काळदुर्ग किल्ल्याचा ट्रेक केला होता आणि यावेळी आम्ही तांदुळवाडी किल्ल्याचा ट्रेक करण्याचे ठरविले. तांदूलवाडी गाव आणि लालठाणे गाव या दोन्ही गावातून आपण तांदूलवाडी किल्ल्याला पोहोचू शकता. पायथ्याला असलेल्या तांदुळवाडी गावामुळेच किल्ल्याला तांदुळवाडी किल्ला असे नाव पडले असावे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही मार्गाने जवळपास एक तास ट्रेक केल्यानंतर आपण एका पठारावर पोहचतॊ आणि त्यानंतर दोन मार्गांद्वारे आपण गडावर पोहोचू शकता. एक मार्ग जो गडाच्या दक्षिणेकडून आहे जो छोटा पण चढ असलेला आहे आणि दुसरा मार्ग उत्तरेकडून जो अगदी सोपा परंतु लांब आहे. 
आम्हाला सर्व मार्गांचा अनुभव घ्यायचा होता. म्हणूनच आम्ही योजना अशी आखली कि आपण तांदुळवाडी गावातून ट्रेक सुरू करू, मग गडाच्या दक्षिणेकडील मार्गाने गडावर पोहचू  व नंतर उत्तरेकडून खाली उतरून लालठाणे गावातून येऊ. दोन्ही गावातील अंतर फारच कमी आहे (२ किमो पेक्षाही कमी) आणि एकाच रस्त्यावर आहेत. त्यामुळे परतीच्या प्रवासासाठी तुम्ही कोणत्याही गावातून एसटी बस पकडू शकता.    

पायथ्याच्या गावात कसे पोहोचेल? (How to reach base village?)

आपण पश्चिम रेल्वेच्या कोणत्याही स्टेशनला पोहचा व तेथून डहाणू लोकल पकडा. आम्ही सकाळी ५ वाजता घरातून निघालो होतो व घरापासून अंधेरी रेल्वे स्थानकासाठी रिक्षा घेतली आणि सकाळी ६ वाजता डहाणूसाठी लोकल ट्रेन मिळाली. साडे सात च्या दरम्यान आम्ही सफाळे स्टेशन (Saphale railway station) उतरलोत व उतरताच बस स्टॉप कोठे आहे याची चौकशी केली. स्टेशन मधून बाहेर पडल्यावर, सफाळे पूर्वेला अगदी २ मिनिटे चालताच आपण बस स्टॉपला पोहचता. ८ वाजता आम्ही एसटी बस पकडली व अर्ध्या तासाच्या आतच तांदुळवाडी गावात उतरलोत. सकाळच्या वेळी रेल्वे व बस ह्या अर्ध्या एक तासाच्या अंतराने भेटतीलच. गावातून किल्ल्याचे दिसणारे दृश्य आपण खालील फोटो मध्ये पाहू शकता त्यातून आपल्याला किल्ल्याच्या अवाढव्यतेचा अंदाज येईल.

tandulwadi fort, palghar
गावातून किल्ल्याचे दिसणारे दृश्य 

ट्रेक सुरवात

गावामध्ये  उतरताच डाव्या बाजूला असलेली शाळा व तेथे खेळणाऱ्या मुलांना पाहून आपल्या लहानपणाची शाळा आठवेल एवढ नक्की. शहरात जागेच्या अभावी आता अश्या शाळा बघायला देखील मिळत नाहीत. खालील फोटो मध्ये आपण ती शाळा पाहू शकता.

tandulwadi village school
तांडूलवाडी गावची शाळा

ट्रेक मार्ग तांदुळवाडी गावातूनच जातो व गावकऱ्यांकडे प्रारंभिक मार्गाची आम्ही विचारपूस केली. गाव संपताच पुढील मार्ग घनदाट जंगलातून जातो पण पायऱ्या असल्या कारणाने आपण मार्ग चुकण्याची शक्यता खूप कमी आहे. काही मार्ग ग्रामस्थानी बनवले आहेत, पण आम्ही पायऱ्यांची वाट आणि नेहमी विस्तृत मार्गवरच चालत राहिलोत. चढ अतिशय मंद व कमी थकवणारा आहे. जवळपास एक तासाच्या ट्रेक नंतर आम्ही विस्तृत अश्या पठारावर किंवा मैदानावर आलोत जेथून डाव्या बाजूला गडावर जाण्यासाठी दक्षिणेकडील मार्ग, तर सरळ गेले असता लालठाणे गावातून येणारा मार्ग भेटतो जो आपणास उत्तरमार्गे गडावर घेऊन जातो. खालील फोटोमध्ये आपण किल्ला व दक्षिणेकडील तीव्र चढ मार्ग पाहू शकता.

tandulwadi fort palghar
किल्ला व दक्षिणेकडील तीव्र चढ मार्ग

खरं तर हा मार्ग अतिशय अवघड नक्कीच नाही पण सरकती माती, सूर्याच्या प्रखर किरणांमुळे लवकर येणारा थकवा, काही तीव्र असे चढ आणि जर आपण नवख्या ट्रेकर सोबत आला असाल तर मात्र थोडी जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात तर हा ट्रेक ह्या मार्गाने बराच थरारक असेल एवढा नक्की.  खालील फोटोमध्ये चढ कशाप्रकारचे आहेत त्याचा अंदाज आपणास येईल. 

tandulwadi fort palghar
तीव्र चढ

आम्ही हा ट्रेक पहिल्यांदाच करत होतोत त्यामुळे आपण योग्य मार्गावर आहोत का हा प्रश्न राहून राहून मनात यायचाच. वर पहिले असता काही उंची पर्यंतच मार्ग दिसायचा आणि जेव्हा आम्ही तिथे पोहचायचो तेव्हा पुढील थोडा मार्ग नजरेस यायचा. पुढील एक तास असेच चालू राहिले व शेवटी खालील फोटोमध्ये दिसत असलेल्या चढ नंतर दहा मिनिटात आम्ही गडावर पोहचलोत, त्यावेळी ११ वाजले होते.


tandulwadi fort trek
किल्ल्याचा शेवटचा चढ 

गडावर भेट देण्याचे ठिकाणे  महत्त्व (Places to visit on fort) 

किल्ला पाहण्यास सुमारे 30 मिनिटे लागली. किल्ल्याचा विस्तार दक्षिणोत्तर असून किल्ल्याला तटबंदी नाही पण गडाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला खोल दरी आहे त्यामुळे निसर्गानेच किल्ल्याला संरक्षण दिले. खालील फोटो मध्ये पूर्वेकडील कातळ कडा पाहू शकता. 


tandulwadi fort trek
नैसर्गिक तटबंदी (पूर्वेकडील कातळ कडा )

हा किल्ला प्रामुख्याने जवळपासच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी वापरला जात असावा. किल्ल्याच्या पूर्वेकडून दिसणारा सूर्या आणि वैतरणा नद्यांचा संगम व पुढे किल्ल्याला समांतर वाहत जाणारी वैतरणा नदीचे दृश्य आपणास नक्कीच आवडेल. खालील फोटो मध्ये ते दृश्य आपण पाहू शकता.

surya and vaitarna river sangam tandulwadi fort
सूर्या आणि वैतरणा नद्यांचा संगम

गडावर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत. त्यातील एक पाण्याच्या टाकीचे क्लस्टर सर्वात प्रसिद्ध आहे जे खालील फोटोमध्ये आपण पाहू शकता आणि कमालीची गोष्ट म्हणजे पावसाळा संपून तीन महिन्यांच्या वर लोटली तरी त्यात पुरेसे पाणी होते परंतु पिण्यास योग्य नाही. गडावर राहणाऱ्या लोकांच्या गरजा भागविण्यासाठी जल-साठवणुकीच्या रचना करण्याच्या प्राचीन कल्पकतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील डोंगरी किल्ल्यांमध्ये वापरले जाणारे हे तंत्र. अन्य पाण्याच्या टाक्या एकतर भग्नावस्थेत आहेत किंवा सुखल्या आहेत.



tandulwadi fort water tank cluster
पाण्याच्या टाकीचे क्लस्टर

आम्ही किल्ल्याच्या मध्यभागी पोहोचलो जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि येथूनच उजव्या बाजूकडील रस्ताने आम्हाला किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत नेले. दोन्हीचे छायाचित्र खाली दाखविले आहे. आपण स्वत:चे टेन्ट घेऊन येणार असाल तर रात्री येथे राहू शकता. 

chhatrapati shivaji maharaj statue at tandulwadi fort
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा



Tandulwadi fort main entrance gate
मुख्य प्रवेशद्वार
  
सर्व किल्ला पाहून झाल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ह्या किल्ल्याला संवर्धनाची अतंत्य गरज आहे. महाराष्ट्रात अशा अनेक संस्था व लोक आहेत जे निस्वार्थीपणाने हे कार्य करत आहेत. आशा आहे की आपण ट्रेकिंग सोबतच ह्या कार्याला हातभार लावावा.

परतीचा प्रवास

दुपारी एकच्या दरम्यान आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवेशद्वारातून आम्ही थोडेसे खाली उत्तरेकडे काही मिनिटे चालत गेलोत आणि मग आम्हाला दोन मार्ग मिळाले ज्यामधील एक डावीकडे खाली उतरत जातो, पण भासत जरी असला तरी हा मुख्य मार्ग नव्हे. तर दुसरा मार्ग सरळ असून, प्रथम थोडेसे वर जातो आणि नंतर खाली उतरून उजवीकडे मुख्य मार्गाशी मिळतो. हा मार्ग अगदी घनदाट जंगलातून जात असून पूर्ण रस्त्यात पायऱ्या आहेत. जर आपण ह्याच मार्गावर चालत राहिलात तर लालठाणे गावात पोहचाल आणि जर आपण त्या पठारावरून उजवीकडे गेलात तर तांदुळवाडी गावात जाताल. ठरल्याप्रमाणे आम्ही त्याच मार्गावर चालत राहिलोत व दीड तासाने लालठाणे गावात पोहचलोत. अर्ध्या तासानंतर आम्हाला सफाळे स्टेशनसाठी एसटी बस मिळाली आणि तेथून चर्चगेट फास्ट लोकल पकडून अंधेरी स्टेशनला  उतरलोत.

उपयुक्त टिप्स
  • पावसाळ्यात दक्षिणेकडून ट्रेक करताना सावधगिरी बाळगा.
  • पावसाळ्यात धबधब्याचा आनंद घ्यायचा असेल तर लालठाणे गावाकडून ट्रेक करावा. 
  • जवळपास सर्व मार्ग घनदाट जंगलातून असल्याने तो आपणास उन्हापासून वाचवतो पण आपला गोंधळ ही करू शकतो.
  • उत्तरेकडील परतीचा मार्ग आधीच बघून ठेवावा.
  • दक्षिणेकडून परतीचा ट्रेक टाळावा, विशेषता पावसाळ्यात व सोबत नवखे ट्रेकर असताना.
  • ट्रेक सकाळी लवकरच चालू करावा.
  • सोबत पुरेसे पाणी नेहमी असू द्या कारण गडावर पाण्याची सोय नाही.
जय शिवराय

#tandulwadifort #tandulwadi #lalthane #saphale #palghar #sahyadribhatkanti #bhatkanti #trekkingin sahyadri #trekblogs #marathiblogs #treksnearmumbai #onedaytreks #easytreksnearmumbai 

Reactions:

Post a Comment

2 Comments

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)

Close Menu