ओळख सह्याद्रीची | प्राकृतिक सह्याद्री व महाराष्ट्र | भूगोल भटकंती | Physical Geography of Sahyadri Mountains | Western Ghats | Bhugol Bhatkanti | Sahyadri Bhatkanti

भूगोल भटकंती सिरीज - प्राकृतिक सह्याद्री व महाराष्ट्र

Physical geography western ghat

जय शिवराय मित्रानो, आपण बोलणार आहोत "भूगोल भटकंती" या आपल्या सिरीज मधील 'ओळख सह्याद्रीची - प्राकृतिक सह्याद्री आणि महाराष्ट्र'  या विषयावर. आपला जास्तीत जास्त भर हा प्राकृतिक सह्याद्रीवर असणार आहे, पण त्याचबरोबर सह्याद्री हा आपल्या महाराष्ट्राचा अविभाज्य अंग असल्या कारणाने प्राकृतिक महाराष्ट्र ही बराचसा जाणून घेणार आहोत.

Physical geography of Sahyadri / western ghat

तर मित्रानो, एकूण आठ उपविषय (subtopic) मध्ये आपण प्राकृतिक सह्याद्री आणि महाराष्ट्र यांचे विभाजन केले आहे.
१) सह्याद्रीचा विस्तार (देश आणि महाराष्ट्र)
२) सह्याद्रीच्या उपरांगा (तीन डोंगररांगा)
३) सह्याद्रीतील जैवविविधता (Biodiversity)
४) महाराष्ट्रातील शिखरे 
५) महाराष्ट्रातील घाट 
६) महाराष्ट्रातील नद्या 
७) महाराष्ट्रातील किल्ले आणि ट्रेक्स 
८) महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे 

चौथा ते आठव्या उपविषयातील काही निवडक ठिकांणाबद्दलच माहिती घेणार आहोत.

१) सह्याद्रीचा विस्तार
     देश पातळीवर-
Sahyadri/western ghat mountain range

> सह्याद्रीला पाश्चिम घाट (Western Ghat) या नावानेही ओळखले जाते.

> सह्याद्री हि एक पर्वतरांग आहे जी भारताच्या पश्चिमेला म्हणजेच दक्खन किंवा महाराष्ट्र पठाराच्या (Deccan Plateau) पश्चिमेला उत्तेरेकडून दक्षिणेस सुमारे १६०० किमी एवढी लांब आहे.

> ही रांग अरबी समुद्राला समांतर आहे.

> गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेजवळ सह्याद्रीचा उगम होऊन ती महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमधून  पुढे जाते व शेवटी कन्याकुमारी येथे संपते.

Sahyadri/western ghat mountain range

> ह्या पर्वतरांगेचे एकूण क्षेत्रफळ १४०००० किमी वर्ग (sq.km) एवढे असून सरासरी उंची ही १२०० मीटर आहे.

> सह्याद्रीमधील सर्वोच शिखर हे केरळ राज्यातील आनेमुडी असून त्याची उंची २६९५ मीटर आहे.

> सह्याद्रीच्या पश्चिम बाजून तीव्र तर पूर्वेला मंद उतार  आहे.


महाराष्ट्र पातळीवर-

Sahyadri/western ghat mountain range in maharashtra

> महाराष्ट्रामधील सह्याद्रीची लांबी ही ७२० किमी असून सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते तर दक्षिणेकडे कमी होत जाते.

> सह्याद्रीमुळेच महाराष्ट्राचे तीन विभाग पडतात ज्यात सह्याद्रीच्या पश्चिमेला कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत व  सह्याद्रीच्या पूर्वेला पसरलेला पठारी प्रदेश म्हणजेच महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार.

Sahyadri/western ghat mountain range in maharashtra

> महाराष्ट्रामधील सह्याद्रीची सरासरी उंची ९१५ ते १२२० मीटर एवढी आहे.

> कळसुबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीमधील सर्वोच्य शिखर.

> मुखतः महाराष्ट्रातील सह्याद्रीचा पर्वतमय भाग हा नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांचा पश्चिम भाग तर ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा पूर्व भाग आहे.

Sahyadri/western ghat mountain range in maharashtra


२) सह्याद्रीच्या उपरांगा 

> सह्याद्री पर्वताच्या तीन मोठ्या डोंगररांगा आहेत ज्यांचा सह्याद्रीच्या पूर्वेला विस्तार झालेला आहे.

Sahyadri/western ghat mountain range in maharashtra

> उत्तेरेकडून दक्षिणेकडे जाता सर्वात पहिली डोंगररांग म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगररांग. या डोंगररांगेच्या पश्चिम भागास सातमाळा डोंगर तर पूर्व भागास अजिंठा डोंगर म्हणून ओळखले जाते. या डोंगररांगेमुळेच गोदावरी व तापी नदीची खोरी वेगळी झाली आहेत.

> दुसरी डोंगररांग ही हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्या पश्चिम भागास हरिश्चंद्र घाट तर पूर्व भागास बालाघाट या नावाने ओळखले जाते. गोदावरीच्या दक्षिणेस ही डोंगररांग असून त्यामुळे गोदावरी व भीमा नदीची खोरी वेगळी होतात.

> तिसरी डोंगररांग आहे शंभू महादेव डोंगररांग जी महाराष्ट्रात पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगररांग आहे. ही डोंगररांग रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरली असून सातारा व सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जाते. भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस ही डोंगररांग असून यामुळे भीमा व कृष्णा नदीची खोरी वेगळी झालेली आहेत.


३) सह्याद्रीमधील जैवविविधता (Western Ghat Biodiversity)

> तर मित्रांनो, आपला सह्याद्री हा हिमालयापेक्षाही जुना असून जगभरामध्ये जैवविविधतेची जी आठ हॉटस्पॉट (Biodiversity Hotspot) आहेत त्यापैकी एक हा आपला सह्याद्री आहे.

> सह्याद्रीमध्ये भारत सरकारने नेमलेली असंख्य संरक्षित क्षेत्रे आहेत ज्यामध्ये दोन राखीव जैवमंडळे (Biosphere Reserve) आहेत त्यातील एक निलगिरी जैवमंडळ (Nilgiri Biosphere Reserve) व दुसरे अगस्तमलाई जैवमंडळ (Agasthyamalai  Biosphere Reserve) आहे.

> त्याशिवाय अनेक राष्ट्रीय उद्याने (National Park), वन्यजीव अभयारण्य (Wildlife Sanctuaries), राखीव वने आहेत.

> सह्याद्री हे ५००० पेक्षाही जास्त फुलांच्या प्रजाती, १३९ सस्तन प्राणी (Mammal animals), ५०८ पक्षी प्रजाती आणि १७९ उभयचर प्राणी (Amphibians) यांचे घर आहे.

> यातील कमीतकमी ८४ उभयचर प्राणी, १६ पक्षी प्रजाती, ७ सस्तन प्राणी आणि १६०० फुलांच्या प्रजाती ह्या फक्त आपल्या सह्याद्रीमध्येच आढळतात.

> त्याच बरोबर जगभरात धोक्यात असलेल्या किंवा नामशेष होत असलेल्या (Endangered Species) वनस्पती, प्राणी, पक्षी व मासे यांच्या कमीतकमी ३२५ प्रजाती या सह्याद्रीमध्ये आढळतात.

World heritage sites in sahyadri/western ghat, maharashtra

>मित्रांनो, २०१२ मध्ये युनेस्को (UNESCO) या संघटनेने सह्याद्रीमधील ३९ ठिकाणांना जागतिक वारसा स्थळे (World Heritage Sites) म्हणून घोषित केले आणि यात आपल्या महाराष्ट्रातील कास पठार, कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान व राधानगरी वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो.


४) महाराष्ट्रातील शिखरे 

> महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरांमधील बहुतेक शिखरे ही सह्याद्रीमध्येच आहेत.

Sahyadri /western ghat mountain range in maharashtra

> महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे ज्याची १६४६ मीटर उंची असून ते अहमदनगर जिल्ह्यात आहे.

> त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यातील साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर असून त्याची उंची १५६७ मीटर आहे व हा महाराष्ट्रातील सर्वोच्य किल्ला आहे.

> त्याशिवाय खालील काही महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे 

> महाबळेश्वर, सातारा (१४३८ मीटर)

> हरिश्चंद्रगड, अहमदनगर (१४२४ मीटर)

> सप्तशृंगी, नाशिक (१४१६ मीटर)

> तोरणा, पुणे (१४०४ मीटर)

> त्र्यंबकेश्वर, नाशिक (१३०४ मीटर)


५) महाराष्ट्रातील घाट

> महाराष्ट्रातील महत्त्वाची घाट ही बहुतेक सह्याद्रीमध्येच आहेत व ती खालीलप्रमाणे,

Ghats in sahyadri, maharashtra

> थळघाट/कसारा घाट (मुंबई - नाशिक)

> बोरघाट (मुंबई - पुणे)

> कुंभार्ली घाट (चिपळूण - कराड)

> आंबा घाट (रत्नागिरी - कोल्हापूर)

> आंबोली घाट (सावंतवाडी - बेळगाव)

> फोंडा घाट (कोल्हापूर - पणजी)


६) महाराष्ट्रातील नद्या 

> मित्रांनो, सह्याद्री हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे ज्यामुळे नद्यांचे दोन विभाग होतात.

Rivers in sahyadri mountains, maharashtra

> पूर्ववाहिनी नद्या - सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावून दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या नद्या, उदाहरणार्थ, गोदावरी, भीमा, कृष्णा.

> पश्चिमवाहिनी नद्या - सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे कोकण किनारपट्टीवरून वाहत जाणाऱ्या नद्या, उदाहरणार्थ, वैतरणा, उल्हास, सावित्री.

> याशिवाय वर उल्लेख केलेल्या नद्यांच्या अनेक उपनद्यांचा देखील उगम हा सह्याद्रीमध्येच आहे.


७) महाराष्ट्रातील किल्ले व ट्रेक्स

> महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासाचे साक्षीदार असलेले बहुतेक किल्ले हे सह्याद्रीमध्येच आहेत व जवळपास सर्व किल्ल्यांना भेट देण्यासाठी ट्रेक करत जावे लागते.

Forts in sahyadri mountains, maharashtra

> इतिहासप्रेमी, भटकंतीप्रेमी यांसाठी सह्याद्री हा स्वर्गच आहे मित्रांनो.

> त्यापैकी काही महत्त्वाचे किल्ले खालीलप्रमाणे

> साल्हेर - मुल्हेर किल्ला

> अंकाई - टंकाई किल्ला

> हरिश्चंद्रगड

> रायगड

> कर्नाळा किल्ला

> प्रबळगड

> लींगाणा किल्ला

> सिंहगड

> पुरंदर किल्ला

> शिवनेरी किल्ला

> लोहगड

> राजमाची किल्ला

> रोहीडेश्र्वर किल्ला

> राजगड

> तोरणा किल्ला

> प्रतापगड

> सज्जनगड

> वासोटा किल्ला

> पन्हाळा किल्ला

> विशाळगड

> ह्या व्यतिरिक्त शेकडो किल्ले महाराष्ट्राला लाभले आहेत.

> काही महिन्यांपूर्वी, महाराष्ट्रातील जमेल तेवढी माहिती जमा करून ट्रेकची यादी गूगल मॅप वर बनवण्यात आली होती ती आपल्या सोबत शेअर करत आहे व आपण पाहू शकाल की बहुतांश ट्रेक हे सह्याद्रीमध्ये आहेत.

Treks in sahyadri mountains, maharashtra

> यात जवळपास २०० पेक्षा अधिक ट्रेक समाविष्ट केलेले असून अजुन बरेच बाकी आहेत.


८) महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे

> महाराष्ट्रातील किल्ले व ट्रेक व्यतिरिक्त जी अन्य पर्यटन स्थळे तिही बरीचशी सह्याद्रीमध्ये किंवा आसपासच्या प्रदेशातच आहेत.

Tourist places in sahyadri mountains, maharashtra

> अन्य पर्यटन स्थळे जसे,

> अष्टविनायक मंदिरे

> प्राचीन लेणी

> शिल्पस्थान 

> ज्योतिर्लिंग मंदिरे

> ऐतिहासिक स्थाने

> धार्मिक स्थळे

> थंड हवेची ठिकाणे इत्यादी.


तर मित्रांनो, आपल्याला भूगोलाचे धडे शिकवण्याचा आमचा प्रयत्न नाही किंवा मी कोणी जिओलोजिस्ट देखील नाही. प्रयत्न आहे तो आपला सह्याद्री किती अमूल्य आहे हे लोकांपर्यंत पोहचवण्याचा.

ह्या सह्याद्रीमध्ये भटकंती करताना मिळालेले नखभर ज्ञान आपल्यासोबत शेअर केले आहे.

ह्या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी भूगोल भटकंती येथे क्लिक करा.

जय शिवराय

#bhugol_bhatkanti  #sahyadri_bhatkanti  #physical_sahyadri #physical_maharashtra #physical_westernghat #sahyadri_biodiversity #westernghat_biodiversity #maharashtra_tourism #sahyadri_tourism #westernghat_tourism #trekking_in_sahyadris #ghats_in_maharashtra #rivers_in_maharashtra #forts_of_maharashtra #sahyadrimountains

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu