कोरोना Unlock मध्ये मुंबई पुणे मुंबई असा प्रवास (road trip) झाला आणि एवढे महिने झाले, ट्रेकिंग जरी करता नाही आली तरी मार्गातील किल्ले, पर्यटन स्थळे यांना पाहता आले. ह्या ब्लॉग मध्ये पुणे ते मुंबई असा प्रवास समाविष्ट केला आहे व त्याचबरोबर मार्गातील बहुतांश किल्ल्याची, ट्रेकची माहिती देखील आपल्याला मिळेल.
आपल्याला हाच ब्लॉग यूट्यूब वर पहायचा असेल तर त्याची लिंक शेवटी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई ते पुणे ह्या प्रवासाचा ब्लॉग व vlog ची लिंक देखील आपल्याला खाली मिळेल.
पुणे येथील मल्हारगड करण्याचा आमचा मानस होता परंतु पुणे मधील लॉकडाऊनचे नियम बदलेले कारणाने आम्हाला परतीच्या प्रवासाला निघावे लागले. पण जाताना आम्ही दोघेच बाईकवर असल्या कारणाने हवे तिथे थांबता येणार होते त्यामुळे अविस्मरणीय असा हा माझा प्रवास होणार होता.
पुणे (मुळशी) पासून सकाळी ६ वाजता आम्ही आमचा प्रवास सुरू केला व मुंबई पुणे जुना महामार्गाने दुपारी १२ वाजता आम्ही आमच्या घरी घाटकोपर, मुंबई येथे पोहचलो. आमचा प्रवास पुढीलप्रमाणे -
मुळशी (सूस) > देहू रोड > कामशेत > मळवली > लोणावळा > खंडाळा > खोपोली > खालापूर > चौक > पनवेल > नवी मुंबई > कळंबोली > मानखुर्द > घाटकोपर (मुंबई)
सूस गाव, पाषाण रोड, मुळशी येथून निघाल्यानंतर आम्ही आधी मुंबई पुणे जुना महामार्गाला लागलो व देहू रोड पर्यंत नॉन स्टॉप आलोत.
देहू रोडपासून काही अंतरावरच सोमाटणे टोलनाका लागेल व त्याच्या थोडे पुढे डाव्या बाजूला बिर्ला गणपती मंदिर आहे. गणपतीची उंच, सुंदर व भव्य मूर्ती येथे उभी करण्यात आली असून लांबूनही आपले लक्ष नक्कीच वेधून घेईल.
रोडवरूनच गणरायाचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. त्या नंतर काही किमी अंतरावर आपल्याला कामशेत लागेल. आपल्याला माहीतच असेल कामशेत हे पॅराग्लायडिंगसाठी (Paragliding) प्रसिद्ध आहे व कोरॉना परिस्थितीमुळे सध्या जरी बंद असले तरी जेव्हा चालू असते तेव्हा अनेक पॅराग्लायडर्स आपण आकाशात झेपावलेले मुंबई पुणे महामार्गावरून पाहू शकाल. आयुष्यात एकदा तरी ह्याचा आनंद नक्की घ्या.
त्यानंतर आम्ही थांबलोय ते मळवली जवळ, जेथून डावीकडे आपल्याला लोहगड आणि विसापूर किल्ला सहज नजरेस पडेल. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून, धुकेमय वातावरणात मळवली जवळ हा फोटो घेण्यात आला.
येथून मळवली स्थानक अगदी ३ किमी अंतरावर असून आपण मळवली उड्डाणपूल ओलांडून गेल्यावर उजवीकडे वळून लोहगड ट्रेक मार्गे आपण दोन्ही गडाचे मध्ये जाल, जेथून आपण विसापूर किंवा लोहगड दोन्ही कडे सहज जाऊ शकता व जमलेच तर एकाच दिवशी दोन्ही किल्ल्यांना भेट देऊ शकता. लोहगड ट्रेक बराच सोपा असला तर गड पाहण्यासाठी बराच वेळ लागतो, विशेषतः विंचू कडा जो आपल्याला ह्या फोटो मध्ये दिसून येत आहे. मळवली स्थानकापासून आपण लोहगड, विसापूर, भाजे लेणी व कार्ला लेणी यांना सहज भेट देऊ शकता.
पुढे आम्ही ०८:३० च्या दरम्यान पोहचलो लोणावळा मध्ये, पण इच्छा असूनही चिक्की मात्र घ्यायची राहून गेली.
आता काही अंतरावर आम्हाला घाट मार्ग लागणार होता पण त्या आधी लक्ष गेले ते खंडाळा येथील रोडच्या डावीकडे असणाऱ्या सुंदर अश्या तलावाकडे. बरीच लोकं तिथे मासेमारी करीत होती. तलावाला खंडाळा तलाव ह्या नावाने ओळखले जाते.
खंडाळा घाट मार्ग लागताच पाहिले दृश्य ठिकाण म्हणजे खंडाळा येथील माकड पॉइंट (Monkey Point, Khandala). येथून आपल्या डाव्या बाजूला आपल्याला दिसेल एक सुंदर असा धबधबा व उजवीकडे डोंगराची रांग व त्यामधून वाहणारी उल्हास नदी.
पावसाळा हंगाम असल्याने पूर्ण धुक्याची चादर डोंगरांनी ओढली होती. जर आपण नीट लक्ष दिले तर उजवीकडे आपल्याला राजमाची किल्ला म्हणजे मनरंजन किल्ला आणि श्रीवर्धन किल्ला ही नजरेस पडेल.
राजमाची ट्रेक आपण कर्जत किंवा लोणावळा मार्गे करू शकता किंवा एका मार्गाने वर चढून जाणे तर दुसऱ्या मार्गाने परतणे. किल्ल्याच्या पायथ्याच्या गावी आपल्याला राहायची व जेवायची संपूर्ण व्यवस्था आहे. मित्रांनो, माझी आपल्याला हा सुजाव असेल की आपण कर्जत मार्ग नक्की ठेवावा आपल्या ट्रेक योजनेमध्ये कारण त्याच मार्गाने आपण प्रसिद्ध कोंढाणे लेणी यांना भेट देऊ शकता. कर्जत मार्गे ट्रेक हा जवळपास ३ तासाचा असून सर्वोत्तम हंगाम पावसाळा आहे.
माकड पॉइंट पासून थोडे पुढे आलात की आपण याल खंडाळा घाट व्ह्यू पॉइंटला (Khandala Ghat view point). खरंच खूप छान नजारा आपल्याला डोळ्यांसमोर दिसेल ज्यात एका बाजूला खंडाळा घाट तर दुसऱ्या बाजूला लक्ष वेधून घेईल नागफणी म्हणजेच Dukes Nose.
नागफणी हा सुंदर पावसाळी ट्रेक आहे. पायथ्याला कुरवंडे हे गाव असून जवळील रेल्वे स्थानक खंडाळा आहे. जवळपास ३ तासाचा हा ट्रेक आहे व श्रेणी सोपी आहे.
तेथून पुढे आले की जुना खंडाळा घाट जवळ उजव्या बाजूला आपल्या नजरेस पडेल तो मंकी हिल (Monkey Hill).
त्यानंतर खोपोली, खालापूर मधून पुढे आम्ही आलो ते मोरबे धरण, चौक जवळ. तेथूनच मार्ग आहे इर्शालवाडीला, जे की इर्शाळगडाचे पायथ्याचे गाव आहे. इर्शाळगड हा ट्रेक करण्यास आपल्याला जवळपास २ तास लागतील व ट्रेक मध्यम श्रेणी मध्ये येतो तर जवळील रेल्वे स्थानक आहे चौक. इर्शाळगडवरून आपल्याला प्रबळगड, मोरबे धरण, माथेरान सहज दृष्टीस पडतील. चौक येथून थोडे पुढे येऊन एक फोटो मी घेतला आहे ज्यात आपण कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड, इर्शाळगड पाहू शकता.
कलावंतीण दुर्ग व प्रबळगड ट्रेकसाठी पायथ्याचे गाव ठाकूरवाडी व जवळील रेल्वे स्थानक आहे पनवेल. जवळपास दोन तासाचा हा ट्रेक असून श्रेणी मध्यम आहे.
पुढे आम्ही पनवेल लागताच जेएनपीटी रोड मार्गे थोडे पुढे येऊन उजवीकडे वळून जेएनपीटी रोड व कळंबोली यांना जोडणाऱ्या मार्गावर आलोत. येथून काळूंद्रे नदी वरील पुलावर थांबून जुना पनवेल कडे पाहिले असता आपल्याला पुन्हा एकदा कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड, इर्शाळगड पहावयाला मिळेल तर कळंबोली कडे पाहिले असता आपण मलंगगड पाहू शकाल.
कॅमेरा मध्ये ते कितपत दिसेल ते माहित नाही पण मी डोळ्याने तेथून गणेश कार्तिक शिखरे सुद्धा पाहिले व त्याच मागे आहे ताहुली शिखर, पांच पीर जे की एक सुंदर पावसाळी ट्रेक आहेत. ताहुली ट्रेकसाठी पायथ्याचे गाव आहे खुशिवली व ट्रेक जरी सोप्या श्रेणीत असला तरी जवळपास ३ तासाचा हा ट्रेक आहे.
मलंगगड साठी जवळील रेल्वे स्थानक आहे कल्याण व पायथ्याचे गाव मलंगवाडी आहे. तीन पातळीमध्ये हा ट्रेक विभाजित आहे, पिर माची, सोन माची व बालेकिल्ला. सोन माची पर्यंत मध्यम श्रेणीचा हा ट्रेक असून जाण्यासाठी दोन तासाचा वेळ लागेल.
ह्याच ब्लॉगचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे ते मुंबई प्रवास येथे क्लिक करा
आमचा अगोदरचा प्रवास म्हणजे मुंबई ते पुणे हा ब्लॉग वाचण्यासाठी मुंबई ते पुणे प्रवास येथे क्लिक करा
#punetomumbai #travel #vlog #rajmachi #dukesnose #lonavala #mumbai #pune #SahyadriBhatkanti
0 Comments