माथेरान रांगेतील एक अपरिचित आणि तितकाच सुंदर किल्ला, सोंडाई. ह्या भटकंतीचा यूट्यूब vlog पाहायचा असेल तर लिंक शेवटी देण्यात आली आहे
नुकताच पावसाळा संपला होता. सार्वजनिक वाहतूक कॉरोना अनलॉक मध्ये तेवढी चालू नव्हती म्हणून आम्ही बाईकने जायचे योजिले होते. सकाळी पाच वाजता मी आणि माझा भाऊ घाटकोपर मुंबई येथून निघालोत व आणखीन दोन ट्रेकर आम्हाला मुलुंड एरोली रोड येथे जॉईन झाले.
मुंबईतून सोंडेवाडीला जाण्यासाठी आम्ही ईस्टर्न एक्सप्रेस हायवे - मुलुंड एरोली रोड - ठाणे बेलापूर रोड - या मार्गाने प्रवास करत कळंबोली जंक्शन येथे आलोत किंवा आपण सायन पनवेल हायवे वाशी ब्रीज मार्गे देखील कळंबोली जंक्शन येथे येऊ शकता. जंक्शन पासून पनवेलकडे जाणाऱ्या मार्गे आम्ही चौक कडे निघालो.
वाटेत अजिवली गावाजवळ आम्ही काही वेळेची विश्रांती घेतली आणि ह्याच गावाजवळून कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगडसाठी मार्ग जातो.
अजिवली पासून अगदीच १०किमी अंतरावर चौक हे गाव आहे. मणिवली गावातून जाणारा इरशाळगडाचा मार्ग येथूनच जातो.
चौकवरून पुढे येताच काही किमी अंतरावर कर्जत फाटा लागला व तेथून डावीकडील मार्ग म्हणजेच चौक कर्जत रोड मार्गे बोरगाव खुर्द गावाकडे आम्ही निघालो.
मोरबे धरणाच्या कडेकडेने आणि इरशाळगड व माथेरान डावीकडे ठेवत आम्ही मार्गक्रमण करत होतोत. कर्जत जवळ उभे असणारे बहुतेक सर्वच किल्ले वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे असल्याने अवघ्या एका दिवसात आरामात पाहून होतात.
बोरगाव खुर्द गाठताच सोंडाई माता प्रवेशद्वार लागले व तेथून सोंडेवाडीकडे आम्ही निघालोत. गाव उंचीवर वसलेले असल्यामुळे किल्ल्याला जाण्यासाठी जास्त चढावे लागत नाही व मार्ग ही थोडा खराब आहे, त्यामुळे आपण कर्जत वरून बोरगाव पर्यंत टमटमने येऊ शकता. पण तेथून सोंडेवाडी गाठण्यासाठी ४-५ किमीची पायपीट करावी लागेल. सोंडेवाडीतून ट्रेक करायचा असेल तर स्वतःची गाडी घेऊन येणे अधिक सोयीचे पण ज्या भटक्यांना प्रत्यक्ष पायपीट आवडते त्यांनी बोरगाव पासून चालतच यावे. वेळ सकाळचं असेल तर येथील निसर्ग न्याहाळत कधी गावात याल हे तुम्हाला देखील कळणार नाही.
सोंडेवाडी हे एक छोटेसे गाव आहे. गाव कसलं, जणू एक आदिवासी पाडाच. सोंडेवाडी व्यतिरिक्त वावर्ले गावातून देखील ट्रेक करता येतो.
गावातून एका निमुळत्या वाटेने आम्ही किल्ल्याच्या पायथी पोहचलो. गावकऱ्यांच्या देखरेखीखाली बाईक पार्क करून आम्ही ट्रेकला सुरूवात केली.
रायगड जिल्ह्याइतकं दुर्गामधील वैविध्य क्विचीतच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असावं. सागरी दुर्गापासून ते डोंगरी दुर्गापर्यंतचा हा प्रवास खरंच अनुभवण्यासारखं आहे व ह्या प्रवासात आपल्याला बरेच अपरिचित किल्ले ही भेटतील. असाच एक अपरिचित आणि तितकाच सुंदर किल्ला आहे सोंडाई. नाव ऐकूनच किल्ल्याबद्दल कुतूहल वाढलं नाही तर नवलच. अश्या किल्ल्यांची नावे जरी आपल्याला परिचित नसली किंवा तेथील इतिहास जरी तितकासा ज्ञात नसला तरीही येथील भूगोल आपल्याला पुरून उरतो. सांगायचे तात्पर्य ऐवढेच की कधी कधी अनोळख्या दुर्ग भेटीसाठी आपण आपली पावले वळवली की तो अनुभव मात्र शब्दांच्याही पलीकडे जातो.
ट्रेक हा सोप्या श्रेणीत येतो व गडमाथ्यावर पोहचण्यासाठी एक तास पुरेसा आहे. पंधरा वीस मिनिटांच्या ट्रेक नंतर आम्ही एका लहान पठारावर येतो व तेथून डावीकडील मार्ग किल्ल्याकडे जातो.
किल्ला हा जवळपास १२०० फूट उंचीवर असून किल्ला भेटीचा सर्वोत्तम हंगाम हा अर्थातच पावसाळा आहे, पण पावसाळा नुकताच संपल्यानंतर देखील आपण येथे येऊ शकता.
किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने टेहळणीसाठी वापरला जात असावा. किल्ल्यावरून मोरबे धरण, इरशाळगड, प्रबळगड, माथेरान व जवळील शिखरांचा सुंदर नजारा पाहायला मिळेल.
एकीकडे पर्यटकांची चैन पुरवणारी माथेरानची व्यावसायिक गजबज आणि दुसरीकडे विकासाच्या प्रतिक्षेत असणारी सोंडेवाडी यादरम्यानची दरी आपल्याला डोळ्यांनीच जाणवते. असे जरी असले तरीही भटकंतीची श्रीमंती सोंडाईच्याच माथ्यावरून भरपेट अनुभवायला मिळते हे मात्र नक्कीच.
किल्ला बघून झाल्यानंतर पुन्हा सोंडेवाडीत उतरू शकता किंवा नवीन वाटेचा अनुभव घ्यायचा असेल तर वावर्ले गावात उतरावे व तेथून कर्जतसाठी टमटम पकडावी.
पाऊण तासाच्या ट्रेक नंतर आम्ही आणखी एका छोट्याश्या निमुळत्या पठारावर आलोत व तेथून थोडे पुढे लोखंडी शिडी चढण्याअगोदर डावीकडे दोन पाण्याच्या टाक्या दिसल्या.
सुरुवातीची लोखंडी शिडी चालून आल्यावर डावीकडे आणखी एक पाण्याची टाकी दिसली.
सर्व शिड्यांची अवस्था अत्यंत चांगली आहे, त्यामुळे एकावेळी काहीजण नक्कीच जाऊ शकतात. ह्यानंतरची शिडी सर्वात लांब असून आपल्याला थेट प्रशस्त अशा कातीलकोरिव पाण्याच्या खांबटाक्याजवळ घेऊन जाते.
लोखंडी शिडी व्यतिरिक्त सुरेक्षिच्या दृष्टीने रेलिंग देखील लावण्यात आली आहे.
आणखी एका लहान लोखंडी शिडी व थोडे पुढे चालून गेल्यावर आम्ही गडमाथ्यावर पोहचलो व समोरच दर्शन झाले ते सोंडाई देवीचे. गडमाथ्यावर असलेल्या सोंडाई देवीच्या नावावरूनच ह्या किल्ल्याचे नाव पडले आहे. गावकरी खूप मनोभावे देवीची पूजा करतात.
किल्ल्याच्या उत्तरेला पूर्ण माथेरान दिसेल, म्हणजे अक्षरशः तेथील पॉइंट देखील पाहता येथील. त्यामागे प्रबळगड, जवळच इरशाळगड व त्याआधी मोरबे धरण याचा सुंदर नजारा पाहायला मिळेल. तर दक्षिण पूर्वेला जवळच भिवगड व सोनगिरी किल्ले आहेत.
गडमाथा बराच लहान असल्याने कॅम्पिंग साठी जागा थोडी अपुरी पडावी पण जरा छोटा ग्रुप असेल तर तेवढी पुरेशी जागा आहे.
जवळपास तासाभराचा वेळ गडावर थांबल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. शेवटीची शिडी उतरल्यानंतर नजर गेली ती डावीकडे जाणाऱ्या एका पायवाटेवर. ही वाट कोठे जात असावी हा प्रश्न राहून राहून येत होता व वेळ देखील पुरेसा त्यामुळे तेथे जाण्याचे ठरवले. वाटेच्या एका बाजूला कातळकडा व दुसरीकडे खोल दरी होती. हा कातळकडा जणू सोंडाई किल्ल्याला लाभलेली नैसर्गिक तटबंदीच.
ह्या वाटेने आम्ही सोंडाई किल्ला व लागूनच असलेल्या डोंगराच्या मधील खिंडीजवळ पोहचलो. येथून पुढे मार्ग व्यवस्थित वाटत नव्हता व झाडी ही बरीच होती, तरीही आम्ही खिंडीत पोहोचलो. पुढे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला, पण सापडेना. त्यामुळे परतण्याचे ठरवले. खाली उतरून गावकऱ्यांकडे विचारपूस केली असता ती वाट डीकसाल गावाकडे जाते असे सांगण्यात आले.
चहू बाजूंनी सह्य शिखरांनी वेढलेल्या अश्या ठिकाणी ट्रेक नंतर पोहायला भेटणे आणि ते ही मोरबे धरणात ह्यासारखे सुख तरी दुसरे काय!
ह्या भटकंतीचा यूट्यूब vlog पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा व चॅनल सबस्क्राइब देखील करा
आमच्या नियमित पोस्टसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल
https://t.me/sahyadribhatkanti
किंवा
फॉलो करा आम्हाला
फेसबुक- https://www.facebook.com/sahyadribhatkanti
इंस्टाग्राम- https://www.instagram.com/sahyadribhatkanti
ट्विटर- https://twitter.com/sahyabhatkanti
पुन्हा भेटूया एका नवीन भटकंती सोबत, जय शिवराय
#sondaifort #matheran #raigad #sondewadi #morbedam #irshalgad #prabalgad #kalavantindurg #marathivlogs #sahyadribhatkanti #travelvlog #trekvlog #trekking #vlogging #travelvlogs #maharashtratourism #maharashtraforts #sahyadri
#marathivlogger #bhatkanti
0 Comments