काही महिन्यांपूर्वी कौटुंबिक कामामुळे पुण्याला गेलो होतो आणि त्याच निमित्ताने दिवे घाटातील श्री विठ्ठल मूर्ती आणि मल्हारगड यास भेट दिली. त्याच भटकंतीचा हा ब्लॉग.
ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटी लिंक देण्यात आली आहे
सकाळी भल्या पहाटेच मुंबई पुणे जुना मार्गाने मी बाईकने प्रवास सुरू केला आणि खंडाळा घाटात काही वेळेची विश्रांती घेतली. खर तर घाटातून नागफणी म्हणजेच dukes nose पाहायचा होता पण धुके एवढे होते की काही दिसेना.
घाटातील tiger valley येथे धुकेमय वातावरणात काही वेळ थांबलो. ऐन पावसाळा संपला असल्याने सगळीकडे हिरवळ व सकाळची वेळ ह्यामुळे अतिशय उत्सहात्मक वाटत होते.
मुंबई पुणे मुंबई हा प्रवास मी बऱ्याच वेळा केला आहे व जुना महामार्गावर जेवढे किल्ले, ट्रेक व पर्यटन स्थळे आहेत त्यांचा माहिती समाविष्ट यूट्यूब व्हिडिओ आणि ब्लॉग देखील केला आहे (लिंक शेवटी देण्यात आली आहे)
मी एक दिवस खराडी येथे राहून दुसऱ्या दिवशी मल्हारगड भेटीसाठी निघणार होतो. सकाळी सात वाजता मी माझा प्रवास चालू केला व जवळपास २० किमी अंतरावर दिवे घाट लागला.
हाच दिवे घाट पेशवाईच्या काळात प्रमुख व्यापारी मार्ग असल्याने त्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि टेहळणी साठी उभारलेले एक त्रिकोणी आकाराचे दुर्गशिल्प म्हणजे किल्ले मल्हारगड.
दिवे घाट संपताच एक छोटीशी पायवाट श्री विठ्ठल मूर्ती कडे जाते. तब्बल ६० फूट उंचीची ही विठ्ठलाची मूर्ती सगळ्यांचे लक्ष आकर्षित करत आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत टाळ मृदंगाच्या तालावर दिवे घाट चढून आल्यावर श्री विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचा थकवा क्षणार्धात निघून जात असावा.
मूर्ती पासून एक वाट वर असलेल्या एका टेकडीकडे जाताना दिसली व मार्ग ही होता म्हणून तेथून आजूबाजूच्या ठिकाणांचा कसा नजारा दिसेल म्हणून टेकडीकडे निघालो.
टेकडीवरून दिवे घाट, मस्तानी तलाव, श्री विठ्ठल मूर्ती व एक डोंगररांग दिसली. ह्याच डोंगर रांगेत पुढे मल्हारगड आहे.
घाटानंतर काही अंतरावरच डावीकडे एक वाट झेंडेवाडी व काळेवाडी ह्या गावातून किल्ल्याला जाते.
मल्हारगड किल्ल्याची बांधणी अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली असून मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला म्हणून देखील हा किल्ला प्रसिद्ध आहे.
गडाच्या अगदीच पायथी गाडी जात असून येथे पार्किंग साठी जागा देखील आहे व त्यासाठी शुल्लक दर आकारला जातो. गाडी पार्क काही पायऱ्या चढून चोर दरवाजा मार्गे गडात प्रवेश केला.
किल्ल्याची तटबंदी बऱ्याच ठिकाणी ढासळली असली तरी मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे.
चोर दरवाजा मधून प्रवेश करून वर गेल्यावर एक विहीर दिसली व समोर होता तो गडाचा बालेकिल्ला. येथे एक बुरुज देखील आहे. गडाचा आकार त्रिकोणाकृती आहे. ह्या टोकाला गडावर येण्यासाठी चोर दरवाजा तर दुसऱ्या टोकाला आहे सोनोरी दरवाजा जो गडाचा मुख्य दरवाजा आहे. आणि तिसऱ्या टोकाला आहे झेंडेवाडी दरवाजा. आणि ह्या त्रिकोणी आकाराचा मध्ये बालेकिल्ला आहे जो चौकोनी आकाराचा आहे.
मल्हारगडाला सार्वजनिक वाहतुकीने यायचे असल्यास आपल्याला आधी सासवड गाठावे लागेल व तेथून सोनोरी गावासाठी बसेस सुविधा आहे. ह्याच गावावरून किल्ल्याला सोनोरीचा किल्ला म्हणून देखील बोलले जाते. ह्या गावात सरदार पानसे यांचा वाडा देखील आहे ज्यांनी ह्या किल्ल्याची बांधणी केली होती. गावातून अर्धा पाऊण तास ट्रेक करत आपण गडावर येतो.
सोनोरी दरवाजा कडे जाताना एक बांधीव पायऱ्या असलेले तळे आहे व बालेकिल्ल्यातून एक बारीक वाट येथे येते. पुढे आणखी एक विहीर दिसली व समोरच चौथरा आहे. येथूनच आता गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे निघालो.
किल्ल्याचा मुख्य दरवाजा भव्य आहे व तट, दरवाजा, पहाऱ्यांच्या देवड्या असे येथे पाहायला मिळते. सोनोरी गावातून आल्यावर याच प्रवेशद्वारातून आपण गडावर येतो.
बालेकिल्ल्यात जाण्यासाठी गडाच्या उत्तरेला महादरवाजा आहे व आत प्रवेश करताच दोन मंदिराच्या शिखराकडे लक्ष वेधले गेले.
पाहिले मंदिर आहे, महादेवाचे, जेथे शिवलिंग व नंदी पाहायला मिळते तर दुसरे मंदिर खंडोबाचे. येथील श्री मल्हारीची मूर्ती पाहून जेजुरीची आठवण येथे. सोबतच आणखी काही मुर्त्या येथे आहेत व याच मंदिरामुळे किल्ल्याला मल्हारगड हे नाव पडले आहे.
मंदिराच्या व्यतिरिक्त बालेकिल्ल्यात वाड्याचे व अन्य अवशेष आणि एक विहीर देखील आहे.
गडावर झाडे लावण्यात आली आहेत व जागोजागी पाठ्या देखील आहेत. ज्याही संघटने तर्फे हे काम झाले त्यांना एक सलाम.
आता मी झेंडेवाडी दरवाजा कडे निघालो व येथून गडाच्या पश्चिमेला असलेल्या निमुळत्या पठारावर जाता येते. येथे एक उंच भगवा झेंडा लावण्यात आला आहे.
गड पाहण्यासाठी अर्धा पाऊण तास लागला. गडाच्या आजूबाजूच्या किल्ल्याचा विचार केला तर किल्ल्याच्या पश्चिमेला सिंहगड आहे तर दक्षिणेला पुरंदर किल्ला, वज्रगड आहे आणि दक्षिण पूर्वेला जेजुरी गड आहे.
तत्कालीन दुर्ग स्थापत्याचे उत्तम उदाहरण, वाहतुकीच्या दृष्टीने पुणे सासवड पासून जवळ, अतिशय सोपी चढाई व गड पाहण्यासाठी लागणारा कमी वेळ आणि मराठ्यांच्या इतिहासातील बांधला गेलेला शेवटचा किल्ला म्हणून नावलौकिक, अश्या या मल्हारगडाला उर्फ सोनोरीचा किल्ल्याला आपण नक्की भेट द्या.
गड पाहून झाल्यावर काळेवाडी गावात पुणे सासवड मार्गाला लागूनच असलेल्या शिवनेरी मिसळ येथे अप्रतिम मिसळेचा आस्वाद घेतला.
तर मित्रांनो, ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
निसर्गरम्य मुळशी | मुंबई ते पुणे | ट्रॅव्हल ब्लॉग
पुणे ते मुंबई | Travel Vlog
जय शिवराय
#malhargad #sonorifort #sahyadribhatkanti #sonori #purandar #diveghat #pune #marathivlogs #travelvlog #trekvlog #trekking #vlogging #travelvlogs #maharashtratourism #maharashtraforts #sahyadri
#marathivlogger #bhatkanti
0 Comments