जय शिवराय,
लग्नानंतर बायकोसोबतची पहिली भटकंती म्हणजे आमची महाबळेश्वर ट्रीप. तब्बल चार दिवस आम्ही तेथे होतो ज्यात आम्ही वेण्णा तलाव येथे boating आणि horse riding, किल्ले प्रतापगड दर्शन, तापोळा येथे boating, पाचगणी येथे horse ride, श्री महाबळेश्वर आणि पंचगंगा मंदिर दर्शन, स्ट्रॉबेरी गार्डन आणि काही पॉइंट्स यांना भेट दिली होती. ह्याच भटकंतीचा ब्लॉग दिवसांप्रमाणे आपल्या सोबत शेअर करत आहे.
दिवस दुसरा - शिवप्रतापाचा साक्षीदार "किल्ले प्रतापगड"
ह्या भटकंतीचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटी लिंक देण्यात आली आहे.
महाबळेश्वर ट्रीप मधील दुसऱ्या दिवसाची सुरूवात आम्ही सूर्य देवाच्या दर्शनाने केली. सकाळी भल्या पहाटेच आमच्या निवासस्थानापासून जवळच असलेल्या विल्सन पॉईंट येथे सूर्योदय पाहण्यासाठी आलोत. आपण ही येथे येण्याचा विचार करत असाल तर सकाळी ७ अगोदर येथे पोहचावे.
टॅक्सीने प्रतापगड दर्शन टूर घेऊन आम्ही गडाकडे निघालोत. महाबळेश्वर ते किल्ले प्रतापगड हे अवघे २० किमी अंतर. जर मुंबई पुणे येथून प्रतापगडाला यायचे असेल तर पुणे ते महाबळेश्वर, वाई पाचगणी मार्गे १२० किमी अंतर असून मुंबई ते महाबळेश्वर, पुणे मार्गे जवळपास २६० किमी अंतर आहे. मुंबई पासून थेट किल्ले प्रतापगड यायचे असेल तर मुंबई गोवा महामार्गाने महाड पोलादपूर मार्गे जवळपास २२० किमी अंतर आहे. सातारा ह्या रेल्वे स्थानकापासून देखील आपण प्रतापगडाला येऊ शकता.
गडाची उंची ३५४३ फूट एवढी असून गडावर पायी जाण्याकरिता पायथी असलेल्या पार आणि कुंभारोशी या गावातून पायवाट आहे. या व्यतिरिक्त किल्ल्यावर जाण्यास काही चोर वाटा देखील आहेत.
लग्नानंतर बायको सोबतची ही माझी पहिलीच किल्ले भटकंती आणि ते ही महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या किल्ले प्रतापगडाला भेट देता आली ह्याचा आनंद होत होता.
अगदीच गडाच्या पायथी टेहळणी बुरूज खालपर्यंत गाडी जात असून पार्किंगची सोय येथे आहे. प्रतापगडावर शिवकालीन निर्मित गडांची सर्व वैशिष्टय एकत्र पाहता येतात.
पायऱ्यांच्या मार्गाने चढून गेल्यावर आम्ही तटबंदीत लपवलेल्या गडाच्या मुख्य प्रवेशद्वार येथे आलोत. ह्या गोमुखी दरवाज्याची बांधणी अश्या प्रकारे करण्यात आली आहे की तोफांचा मारा थेट दरवाज्यावर करता येऊ नये व अरुंद मार्ग असल्याने आक्रमण करणाऱ्या शत्रूवर गनिमी काव्याने मारा करता येतो.
महाद्वाराच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत व उजव्या हाताच्या देवडीत एक तोफ पाहायला मिळेल.
महाद्वारातून बाहेर पडताच उजव्या बाजूने काही पायऱ्या चालून महाद्वाराच्या वर असलेल्या बुरुजावर आलोत. प्रामुख्याने दोन भागांमध्ये किल्ला पाहता येतो. किल्ल्याचा वरचा भाग जेथे बालेकिल्ला, छत्रपती शिवराय स्मारक, भवानी मंदिर, हनुमान मंदिर, केदारेश्वर मंदिर, कडेलोट, तळे, यशवंत आणि रेडकाई बुरुज पाहता येतात.
गडाचा खालचा भाग म्हणजे टेहळणी बुरूज. आम्ही पाहिले टेहळणी बुरूज कडे निघालो.
किल्ल्याचा इतिहास आपणास माहीतच असावा. तरी मोजक्या शब्दात सांगायचे झाल्यास, १६५६ मध्ये चंद्रराव मोरे यांचा पराभव करून शिवाजी महाराजांनी जावळी आपल्या ताब्यात घेतली आणि ह्या जावळीच्या खोऱ्यात भोरप्या डोंगरावर १६५६ ते १६५८ ह्या काळात एक अभेद्य आणि बुलंद किल्ला बांधण्यात आला. तोच हा किल्ले प्रतापगड.
१६५९ साली अफझलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला तेव्हा महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगड खाली जावळी खोऱ्यात आणले व त्याचा वध केला. त्याच्या प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उडवून स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले.
महाराज आणि अफझलखान यांच्या भेटीचा साक्षीदार ठरलेला किल्ले प्रतापगड आज देखील दिमाखात उभा आहे.
टेहळणी बुरुजावर भगवा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे व समोर दिसतो तो किल्ल्याचा दक्षिणोत्तर पसरलेला गडाचा वरचा भाग.
बुरुजावरुन गडाच्या पूर्वेला जवळच अफझलखानाची कबर आहे व
त्यापुढे उत्तर पूर्वेकडे पाहत गेले असता महाबळेश्वर व तेथील sunset point, lodwick point, Elphinstone point, Arther seat point सहज नजरेस पडले.
आणि गडाखाली कुंभारोशी या गावाजवळ शिवकालीन खेडेगाव देखील आहे.
दक्षिण पूर्वेला पाहत गेले असता नागमोडी वळणे घेत वाहत जाणारी कोयना नदी व मकरंदगड दिसला.
पावसाळ्याच्या दिवसात हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असतो व प्रतापगड वरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याचा अनुभव खरंच खूप भन्नाट असावा.
आता आम्ही किल्ल्याच्या वरच्या भागात निघालो. येथे जाण्यासाठी जुनी वाट दोन द्वारातून जाते पण ती सध्या बंद आहे.
त्याऐवजी शेजारून पायऱ्यांचा मार्ग बनविण्यात आला आहे.
भवानी मंदिराकडे जाण्याअगोदर उजव्या बाजूला तळे दिसले. महाराष्ट्राच्या बहुतेक डोंगरी किल्ल्यावर आपल्याला अश्या प्रकाराची तळी पाहायला मिळतात. वास्तविक ह्या दगडाच्या खाणी आहेत.
या खाणीतून काढलेल्या दगडाचा उपयोग किल्ल्यावरील बांधकामासाठी केला गेला व त्यानंतर ह्यात पाणी साठवून तळी निर्माण केली गेली.
श्री भवानी मंदिर दगडी गाभाऱ्याचे असून मंदिरासमोर दोन दगडी दीपमाळा व जवळच नगारखाना आहे. मंदिरात श्री भवानी मातेची प्रसन्न मूर्ती आणि सरनौबत हंबीरराव मोहिते यांची तलवार देखील आहे.
मंदिराच्या आवारात काही छोट्या तोफा देखील पाहायला मिळाल्या.
आता आम्ही काही पायऱ्या चालून किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे निघालो. बालेकिल्ल्याचा दरवाजा अजूनही मजबूत आणि शाबूत आहे.
बालेकिल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असून छोटी बाग देखील आहे. ह्या स्मारकाचे अनावरण ३० नोव्हेंबर १९५७ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले आहे.
"माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य होय. या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणीही असो कधीच यशस्वी झाला नाही" हे शिवछत्रपतींचे उदगार आणि "या शिवाजीराजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांची तुलना जगज्जेत्या अलेक्झांडरशीच होऊ शकेल" हे गोव्याचे पोर्तुगीज गव्हर्नर यांचे उदगार आपल्याला स्माराच्या चौथऱ्यावर पाहायला मिळतील.
स्मारकाच्या मागील वाटेने आम्ही किल्ल्याच्या उत्तरेकडे निघालो व येथे एक चोर मार्ग पहावयास मिळतो.
तटबंदीच्या कडेकडेने कडेलोट पाहून झाल्यावर आम्ही गडाच्या दक्षिणेकडे निघालो. येथे देखील एक चोर मार्ग आहे.
गडावरील सर्व ठिकाणांना निवांतपणे भेट द्यायची झाल्यास २ ते ३ तासाचा अवधी सहज लागावा. पण आम्ही महाबळेश्वर येथून टॅक्सी घेऊन आल्याने एक तासाचाच अवधी गड पाहण्यासाठी मिळाला होता, तरीही अधिकचा वेळ घेत दीड तासात आम्ही गड पायथी पोहचलोत.
वेळेअभावी काही ठिकाणांना भेटायचे राहिल्याने मनात थोडी खंत होती पण पुन्हा नक्की येईन असा मनात निर्धार करत परतीच्या प्रवासाला लागलो.
निवासस्थानी जाऊन दुपारची न्याहारी करून काही वेळेची विश्रांती घेतली व रात्री महाबळेश्रर मार्केट मध्ये खाद्य भ्रमंती देखील केली.
महाबळेश्वर ट्रीप मधील तिसऱ्या दिवशी तापोळा येथे boating व पाचगणी येथील horse ride याचा ब्लॉग लवकरच येईल.
शिवप्रतापाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगडाला आपण नक्की भेट द्या. ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. ह्या माहितीचा संदर्भ काही शालेय पुस्तके व इंटरनेट असून काही तफावत आढळल्यास क्षमा असावी व तसे आपण कमेन्ट्स मध्ये कळवू शकता.
जय शिवराय 🚩
निवास तपशील
शिंदे निवास (Deluxe Family and Couple Rooms available)
पत्ता - १९, शिंदे निवास, गणेश नगर सोसायटी, ससून रोड, महाबळेश्वर
संपर्क - प्रवीण शिंदे ९४२३०३३८८७ / मधुरा शिंदे ९४२३८६८४४७
टेलिग्राम चॅनेल
फेसबुक
इंस्टाग्राम
ट्विटर
#pratapgad #fort #blog #sahyadribhatkanti #marathi #blog #Mahabaleshwar #satara #marathivlogs #travelvlog #trekvlog #trekking #vlogging #travelvlogs #maharashtratourism #maharashtraforts #sahyadri #marathivlogger #bhatkanti
0 Comments