जय शिवराय,
लग्नानंतर बायकोसोबतची पहिली भटकंती म्हणजे आमची महाबळेश्वर ट्रीप. तब्बल चार दिवस आम्ही तेथे होतो ज्यात आम्ही वेण्णा तलाव येथे boating आणि horse riding, किल्ले प्रतापगड दर्शन, तापोळा येथे boating, पाचगणी येथे horse ride, श्री महाबळेश्वर आणि पंचगंगा मंदिर दर्शन, स्ट्रॉबेरी गार्डन आणि काही पॉइंट्स यांना भेट दिली होती. ह्याच भटकंतीचा ब्लॉग दिवसांप्रमाणे आपल्या सोबत शेअर करत आहे.
दिवस तिसरा - महाराष्ट्राचे मिनी काश्मीर - तापोळा
ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडियो पाहायचा असेल तर शेवटी लिंक देण्यात आली आहे.
महाबळेश्वर पासून जवळपास ३० किमी अंतरावर तापोळा हे गाव आहे. गजबजलेले महाबळेश्वर मागे सोडले की घनदाट झाडीतून बाहेर पडताच खोल दऱ्या आणि डोंगरे यांचे दर्शन होते. जवळपास २० किमी अंतरावर तापोळा रोडलाच शिवसागर पॉइंट येथे काही वेळ आम्ही थांबलो.
येथून कोयना नदीचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. हीच नदी पुढे शिवसागर जलाशयाचा भाग होते आणि ह्याच जलाशयाच्या काठी तापोळा व अन्य गावे गेल्या काही वर्षांत पर्यटनासाठी विकसित झाली आहेत.
तापोळा येथे बरीच बोट क्लब आहेत त्यापैकी काळेश्र्वरी बोट क्लब येथे आम्ही आलोत. मोटार बोट, स्पीड बोट, स्कूटर बोट, कायकिंग इत्यादी अशी बरीच सुविधा येथे उपलब्ध होती.
शिवसागर दर्शन, त्रिवेणी संगम, दत्त मंदिर अशी काही ट्रीप येथे आहेत. आपल्याकडे असलेल्या उपलब्ध वेळेनुसार आपण package घेऊ शकता. आम्हाला तापोळा करून संध्याकाळी पाचगणी येथे जायचे असल्याने शिवसागर दर्शन ह्या ४५ मिनिटांच्या फेरीचा package आम्ही घेतला.
साधारण सहा किमीच्या ह्या फेरीत तापोळा सह काठाने जाताना जलाशयाच्या मध्यभागी नेट अथांग जलाशय याचे दर्शन करविले जाते.
शिवसागर जलाशयाच्या काठी बरीच गावे वसलेली आहेत. बोट हे गावकऱ्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन व स्थानिक लोकांनीच पर्यटकांसाठी बोटी व तेथील व्यवसाय यात गुंतवणूक केली आहे.
जलाशयाची सागराएवढी व्याप्ती, निळे पाणी, प्रदूषण मुक्त वातावरण आणि काहीशी दमट पण आल्हाददायक हवा असे तापोळा परिसराचे वर्णन करता येईल.
चहू दिशांना मोठमोठेे डोंंगर, डोंगराच्या पायथ्याशी असलेला विस्तीर्ण जलाशय, घनदाट झाडी व गावांना लाभलेल्या नैसर्गिक संपन्नतेमुळे शेकडो पर्यटक रोज शिवसागर जलाशयात बोटिंगचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
निसर्गाचं भरभरून योगदान लाभलेल्या या परिसराला महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून देखील ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत बरीच कृषी पर्यटन केंद्रे येथे उदयास आली आहेत. या ठिकाणी राहण्याची, खाण्याची, बोटिंग व कॅम्पिंग ह्या सुविधा उपलब्ध आहेत.
आपण येथे स्वतःची गाडी घेऊन येऊ शकता किंवा एसटी बस सेवा देखील उपलब्ध आहे. मुंबई ते तापोळा मुंबई गोवा मार्गाने २५० किमी अंतर असून पुणे मार्गे जवळपास २९० किमी एवढे अंतर आहे. तर पुणे ते तापोळा वाई पाचगणी मार्गे १५० किमी एवढे अंतर आहे.
१५-२० मिनिटांच्या बोट प्रवास नंतर बोट क्लबच्या विरुद्ध बाजूला असलेल्या आपटी ह्या गावाच्या काठी आम्ही आलोत. महाबळेश्वर व तापोळा नुकताच कोरोनो लॉकडाऊन नंतर सुरू झाल्याने पर्यटकांची जास्त वर्दळ येथे नव्हती.
बोटीतून उतरून जवळच असलेल्या सोमजाई काळेश्वरी मंदिराकडे आम्ही निघालो. मंदिर जलाशयाच्या काठापासून थोडे आत असून तेथे जाण्यासाठी कच्ची पायवाट आहे. गावात अजुन आत गेल्यावर बामणोली महाबळेश्वर रोड आहे व तेथून महाराष्ट्राचे Valley of Flower म्हणजेच प्रसिद्ध कास पठार येथे जाता येते.
सोमजाई काळेश्वरी देवीचे दर्शन घेतले व जवळच शंकराची पिंड आहे.
मंदिर परिसरात आणखी एक छोटे मंदिर व दगडी दीपमाळ आहे.
शांत परिसर आणि अफाट जलाशयाचे दृश्य पाहताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. खर तर पूर्ण एक ते दोन दिवस निवांतपणे येथे घालवावा असे हे ठिकाण आहे.
पण वेळेअभावी आणि संध्याकाळी पाचगणी येथे जायचे असल्याने आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. काही वेळेची भटकंती का असेना पण तापोळा येथील ह्या आठवणी मनात नक्कीच घर करून राहिल्या.
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून नावलौकिक आणि नैसर्गिक संपन्नता याने भरपूर ह्या तापोळाला आपण नक्की भेट द्या
महाबळेश्वर ट्रीप मधील तिसऱ्या दिवसाचा दुसरा भाग म्हणजे आम्ही पाचगणी येथील horse ride याचा ब्लॉग लवकरच येईल.
ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडियो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लवकरच भेटूया एका नवीन भटकंती ब्लॉग सोबत.
जय शिवराय
0 Comments