भिवगड | कर्जत | माहिती भटकंती | रायगड | Bhivgad Fort | Karjat | Raigad | Mahiti Bhatkanti | Sahyadri Bhatkanti

 #MahitiBhatkanti सिरीज
(माहिती भटकंती - पर्यटन स्थळांची थोडक्यात माहिती)

Bhivgad Fort karjat

समुद्री किल्ल्यापासून ते डोंगरी किल्ल्यापर्यंत असे वैभव लाभलेला जिल्हा म्हणजे रायगड आणि त्यातही डोंगरी किल्ले किंवा ट्रेक साठी प्रसिद्ध तालुका म्हणजे कर्जत. कर्जत मध्ये बरेच किल्ले / ट्रेक आपल्याला पाहायला मिळतील. सोप्या श्रेणी पासून ते अवघड श्रेणी पर्यंत असे बरेच ट्रेक येथे आहेत. कर्जत मध्ये प्रसिद्ध तर काही अपरिचित असे किल्ले देखील आहेत. असाच एक अपरिचित किल्ला म्हणजे भिवगड. किल्ल्याला भिमगड नावाने देखील ओळखले जाते. 

किल्ल्याची उंची जवळपास ८०० फूट एवढी असून अर्धा तास पुरेसा आहे गडमाथा गाठण्यास. आपण जर पहिल्यांदाच ट्रेकिंग करत असाल तर एक तास देखील लागू शकतो. 

हा ट्रेक दोन गावातून करता येतो. पहिले गाव म्हणजे वडप आणि दुसरे गौरकामत, जे की वडप गावापासून काही मीटर अंतर पुढे आहे. दोन्ही गावापासून जवळपास तेवढाच वेळ गडमाथा गाठण्यास लागतो. पण दोन्ही गावातून येणारे मार्ग मात्र विरुद्ध बाजूला आहेत. वडप गावातून आपण किल्ल्याच्या दक्षिणेकडील बाजूने किल्ल्यावर प्रवेश करतो तर गौरकामत गावातून किल्ल्याच्या उत्तरेकडून. मी हा ट्रेक वडप गावातून केला आहे. दोन्ही गावातून हा ट्रेक सोपी श्रेणी आणि कमी सहनशक्ती पातळी मध्ये येतो.

अर्थातच जवळील रेल्वे स्टेशन हे कर्जत असून स्टेशन पासून वडप गावासाठी वाहने आहेत पण जास्त पैसे लागू शकतात. स्टेशन ते वडप गाव हे जवळपास ८ किमी अंतर. आपण स्वतःची गाडी/बाईक घेऊन येथे येऊ शकता. मी माझी बाईक घेऊन आलो होतो. आपण मुंबईतून येणार असाल तर मुंबई - कळंबोली - पनवेल - चौक - कर्जत असा प्रवास करत वडप गावी येऊ शकता आणि हे अंतर सुमारे ९० किमी आहे ज्यास २ ते ३ तास लागू शकतात.

गडावर पाहण्यासारखे ठिकाणे म्हणजे कातळात खोदलेल्या पायऱ्या, पाण्याच्या टाक्या, गुहा, काही अवशेष आणि गडावरून दिसणारा आजूबाजूच्या परिसराचा विहंगम नजारा. 

किल्ला भेटीचा सर्वोत्तम हंगाम हा पावसाळा असून येथील परिसर मान्सून मध्ये आपण एका वेगळ्याच जगात असल्यासारखा भासतो. पावसाळ्यात जवळच असलेला धबधबा देखील येथील प्रमुख आकर्षण आहे. ट्रेक करून आल्यावर आम्ही देखील येथील धबधब्यात अंघोळीचा आनंद घेतला आहे. अश्या ठिकाणी अंघोळीच्या मोह आवरणे खूप कठीण.

वडप गावातून ट्रेक सुरु झाल्यावर २०-२५ मिनिटांनी एका खिंडीत आपण येतो जेथून डावीकडील वाट किल्ल्याकडे तर उजवीकडील वाट ढाक बहिरी ट्रेक कडे जाते. कर्जत मध्ये range ट्रेकसाठी एक उत्तम पर्याय म्हणून नक्कीच आपण विचार करू शकता. 

ह्या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी माहिती भटकंती येथे क्लिक करा किंवा कर्जत मधील अन्य ट्रेक ब्लॉग वाचण्यासाठी कर्जत येथे क्लिक करा.

जय शिवराय

#bhivgad #bhimgad #vadap #gaurkamat #waterfall #fort #karjat #raigad #sahyadribhatkanti

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu