माहिती भटकंती सिरीज - सोनगिरी किल्ला
रायगड जिल्हा, कर्जत तालुक्यात तसे बरेच किल्ले आहेत आणि काही आपल्या परिचयाचे देखील असतील. पण याच तालुक्यातील सोनगिरी किल्ला (Songiri Fort) मात्र बराच अपरिचित. किल्ल्याला भेट देणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. त्यामुळे ट्रेक मार्ग मळलेला नाही. सहसा हा ट्रेक पळसदरी स्थानक आणि नेवाळी (Newali) ह्या गावातून केला जातो. किल्ल्यास पळसदरी किल्ला (Palasdari Fort) ह्या नावाने ओळखले जाते. पळसदरी स्थानकापासून ट्रेन ट्रॅकवरून जाताना जवळच असलेल्या बोगद्यापासून एक मार्ग किल्ल्याला जातो. तसेच स्थानकापासून आधी अवलास ह्या गावी आणि मग नेवाळी गावात येऊन किल्ल्याला जाता येते. कोणत्याही मार्गाने गेलात तरी योग्य मार्ग शोधण्यात थोडी फार तारांबळ होतेच विशेषतः पावसाळ्यात.
किल्ल्याची उंची (Height of the fort) २५०० फूट इतकी असून नेवाळी गावातून गडमाथा गाठण्यास २ तास लागतात. नेवाळी हे गाव मुंबईपासून ७० किमी तर पुण्यापासून ९० किमी अंतरावर आहे. कधी घनदाट झाडी तर कधी पठारावरून आणि कधी उंच गवतातून मार्ग किल्ल्यावर जातो. किल्ल्यावर दोन पाण्याच्या टाक्या (Water tanks) आहेत. एका टाकीत पाणी आहे तर दुसरी टाकी सुकलेली आहे. तटबंदीचे काही अवशेष देखील गडावर पाहायला मिळतात. गडाचा मुखतः टेहळणीसाठी उपयोग केला असावा.
किल्ला अगदीच मोक्याची ठिकाणी असल्याने रायगड आणि पुणे जिल्ह्यातील अनेक किल्ले, सह्यसुळके येथून नजरेस पडतात. पश्चिमेस सोंडाई किल्ला, माथेरान, पेब किल्ला (विकटगड), प्रबळगड, इरशाळगड आणि मोरबे धरणाचा जलाशय नजरेस येतो. दक्षिणेस थोड पूर्व बाजूला पाहिले असता घाटातील एक सुळका आपले लक्ष वेधून घेतो. तो नागफणीचा डोंगर (Duke's Nose). पूर्वेला राजमाची किल्ला म्हणजेच मनरंजन आणि श्रीवर्धन किल्ले नजरेस येतात. उत्तरेला ढाक बहिरी आहे जो शेजारील कळकराय सुळक्यामुळे ओळखता येईल.
हा किल्ला सर्व बाजूंनी सह्यशिखरे आणि किल्ल्यांनी वेढलेला आहे आणि एका ठिकाणाहून आजूबाजूच्या क्षेत्रातील सुळके, किल्ले पाहणे ही माझी आवडीची भटकंती. त्यामुळे हा ट्रेक माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय भटकंती ठरला.
ह्या सिरीजमधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी
माहिती भटकंती येथे क्लिक करा.
रायगड जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी
रायगड येथे क्लिक करा.
#MahitiBhatkanti #songirifort #palasdari #karjat #raigad #SahyadriBhatkanti
0 Comments