ठिकाण - कर्जत तालुका, रायगड, महाराष्ट्र
पायथ्याचे गाव (Base village) - नेवाळी (Newali)
उंची (Height of the Songiri fort) - 2500 फूट
वेळ - 2 तास
श्रेणी (Trek grade) - सोपी
सहनशक्ती (Endurance level) - मध्यम
जवळील रेल्वे स्टेशन (Nearest railway station) - पळसदरी (Palasdari)
मुंबई ते नेवाळी - 70 किमी
पुणे ते नेवाळी - 90 किमी
दिनांक - 10 ऑक्टोबर 2022
2021 चा पावसाळा संपताच रायगड जिल्हा, कर्जत जवळील एका अपरिचित किल्ल्यास भेट दिली. गडावर जाणारा मार्ग शोधताना झालेली तारांबळ, कधी दाट जंगल, कधी पठारी भाग, तर कधी उंच गवतातून मार्ग काढत केलेली भटकंती. सर्व बाजूंनी सह्यशिखरे, किल्ल्यांनी वेढलेल्या या किल्ल्याने आम्हाला एका अविस्मरणीय भटकंतीचा आनंद दिला. असा "सोनगिरी किल्ला", ज्यास "पळसदरीचा किल्ला" (Palasdari Fort) म्हणून देखील ओळखले जाते.
मुंबई ते नेवाळी गाव प्रवास (How to reach Newali village!)
मुंबईवरून वाशी - पनवेल - चौक असा प्रवास करत कर्जत गाठले. वाटेत पनवेल जवळील कोण ह्या गावापासून कोवळ्या सूर्यकिरणांनी उजळून निघालेला इरशाळगड, प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग पाहिला.
|
कोण गावाजवळ काढलेला फोटो |
कर्जत नंतर उल्हास नदीच्या (Ulhas river) कडीकडीने नेवाळी गावाकडे निघालोत.
|
उल्हास नदीच्या कडीने प्रवास |
नदीवरील पूल ओलांडून थोडं पुढे मोहिली गावात (Mohili village) आल्यावर पुन्हा मागे फिरून जवळील एका वाडीकडे आम्ही निघालो. वाडीत आल्यावर सुरुवातीचा मार्ग गावकऱ्यांना विचारून ट्रेकला सुरुवात केली.
|
वाडी
|
सोनगिरी किल्ल्याला येण्यासाठी जवळील रेल्वे स्टेशन पळसदरी व तेथून नेवाळी गावातून किंवा ट्रेनच्या ट्रॅकवरून थोडे पुढे जाऊन बोगद्याजवळील एका मार्गाने किल्ल्याला येता येते. कुठल्याही वाटेने आलात तरी योग्य मार्ग शोधण्यासाठी थोडीफार तारांबळ होतेच. मुंबई ते नेवाळी हे जवळपास 70 किलोमीटरचे अंतर तर पुणे ते नेवाळी हे 90 किलोमीटरचे अंतर.
ट्रेकला सुरुवात
किल्ला पूर्णपणे धुक्याने वेढलेला होता. आम्ही चुकीच्या मार्गाने जातोय हे वाडीतून एका गावकऱ्यांनी हेरले व आम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आमच्यासोबत आले. वाडीत राहणारे गोपीनाथ भाऊ आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आले आणि स्वइच्छेने आमच्यासोबत किल्ल्याला येण्याची इच्छा दर्शवली. आधी आम्ही चौघे आणि आता ते एक, किल्ल्याकडे निघालोत. खरंच ते सोबत आल्याने आम्हा सर्वाना एक नवीन ऊर्जा मिळाली. येथील काही स्थानिक माहिती देखील त्यांनी दिली.
|
ट्रेक मार्ग |
तसा हा किल्ला बराच अपरिचित. किल्ल्यास भेट देणाऱ्यांची संख्या देखील कमी. त्यामुळे पायवाट तितकीशी मळलेली नव्हती. त्यात घनदाट जंगलातून वाट व पावसाळी हंगाम नुकताच होऊन गेल्याने सर्व ठिकाणी झाडीझुडपे व गवत पसरलेले होते.
|
ट्रेक मार्ग |
ट्रेक सुरु होऊन एक तास झाला होता. घनदाट झाडीतला मार्ग मागे सोडत आता पठारावरून पुढील प्रवास सुरू झाला. किल्ला अगदीच समोर दिसत होता आणि जेव्हाही मागे वळून पाहत होतो, तेव्हा माथेरान रांगेतील किल्ले, सुळके नजरेस येत होते.
|
सोनगिरी किल्ला |
पुन्हा जंगल मार्गातून किल्ल्याच्या अगदीच पायथी निघालोत. कळकराय सुळक्यामुळे जवळील ढाक बहिरी (Dhak Bahiri) मला ओळखता आला.
|
कळकराय सुळका व ढाक बहिरी |
अगदीच पायथी पोहोचल्यावर उजव्या बाजूने गडाच्या कातळकड्याला लागून असलेली वाट धरली. एका बाजूला उभा कातळ कडा आणि दुसऱ्या बाजूला खोलदरी. अशा या मार्गातील उंच गवतातून वाट काढत पुढे निघालो.
एका ठिकाणावरून आजूबाजूचे सह्यसुळके, किल्ले पाहणे ही माझी आवडीची भटकंती. त्यामुळे किल्ल्यावर पोहोचण्याचा उत्साह वाढला होता. कर्जत मधील हा किल्ला अगदीच मोक्याच्या ठिकाणी येत असल्याने येथून रायगड व पुणे जिल्ह्यातील अनेक किल्ले व सह्यसुळके नजरेस येतात. मी आतापर्यंत सोंडाई किल्ला, माथेरान, प्रबळगड, इरशाळगड आणि नागफणीचा डोंगर (Dukes Nose) पाहिला होता. त्याशिवाय कळकराय सुळक्यामुळे ढाक बहिरी देखील ओळखू आला. पण अजून राजमाची किल्ला नजरेस आला नव्हता. किल्ल्याला वळसा घालून आता गडमाथ्यावर जाण्यासाठी चढाई सुरू झाली.
|
गडमाथ्यावर जाण्यासाठी चढाई करताना |
झाडीझुडपे, गवतातून वाट काढत अतिशय काळजीपूर्वक गडाकडे चढण सुरू होते. शेवटच्या टप्प्यात, एका लहानशा खिंडीत आल्यावर, डाव्या बाजूकडील वाटेने गडावर प्रवेश केला.
सोनगिरी किल्ला भटकंती
गडावर गवत इतके वाढलेले होते की काहीच दिसत नव्हते. या गवतांमुळे गडावरील प्रशस्त मोठी पाण्याची टाकी (Water tank) देखील अर्धी झाकून गेली होती.
|
गडमाथा |
|
पाण्याची टाकी |
कसाबसा मार्ग काढत आम्ही किल्ल्याच्या पश्चिम टोकाला आलोत. येथे भगवा ध्वज लावण्यात आला आहे.
येथून किल्ल्याच्या पश्चिम व उत्तरेकडील दृश्य समोर दिसते. ह्या टोकापासून पळसदरी स्टेशन व तेथील धरण दिसत होते. या स्थानकापासून थोडे पुढे आल्यावर बोगद्याजवळील मार्गाने गडाकडे मार्ग येतो. तर थोडे उत्तर दिशेला नागमोडी वळण घेत जात असलेली उल्हास नदी दिसत होती. त्याच नदीच्या कडीकडीने आम्ही मोहिली गावात आल्यावर तेथील एका वाडीतून गडावर आलो होतो. आम्हाला जवळपास दोन तास लागले.
|
पश्चिम व उत्तरेकडील दृश्य |
या किल्ल्यावरून दिसणारे बहुतेक किल्ले किंवा शिखरे यांना मी भेट दिलेली होती. त्यामुळे या जागेशी भरपूर कनेक्ट करू शकलो. सोंडाई किल्ला (Sondai Fort) ट्रेक, वावरले आणि सोंडेवाडी या दोन गावातून करता येतो. सोंडेवाडी गाव थोडे उंचीवर असून तेथून तासाभराचा ट्रेक करून किल्ल्यावर जाता येते. सोंडेवाडी गावातून मी हा ट्रेक केलेला आहे. त्याच्याच मागे माथेरान आहे. माथेरानला गाडी थेट वरपर्यंत जाते. तेथील काही पॉईंट्स देखील दिसून येत होते. माथेरानला बाईकने थेट वर जाऊन तेथील पॉइंट्सना मी भेट दिली आहे.
|
किल्ल्यावरून दिसणारे किल्ले / शिखरे |
माथेरान मधील पॅनोरॉमा पॉईंट (Panoroma Point) दिसत होता व त्याच्याच मागे पेब किल्ला (Peb Fort/Vikatgad Fort) म्हणजेच विकटगड आहे, जो स्पष्ट दिसून आला नाही. आनंदवाडी आणि माथेरान ट्रेन मार्गाने पेब किल्ल्याचा ट्रेक करता येतो. मी ट्रेन मार्गाने आता पर्यंत दोन वेळा ह्या किल्ल्यास भेट दिली आहे. माथेरानच्या बाजूला प्रबळगड (Prabalgad Fort) दिसत होता. प्रबळगडाच्या मागेच कलावंतीण दुर्ग (Kalavantin Durg) आहे. पण तो दिसून येत नव्हता. प्रबळगड आणि कलावंतीण दुर्गला येण्यासाठी ठाकूरवाडी गावातून ट्रेक करता येतो. कलावंतीण दुर्ग हा ट्रेक मी ठाकूरवाडी गावातून केलेला आहे. प्रबळगडाच्या शेजारीच आपल्या विशिष्ट आकारामुळे इरशाळगड (Irshalgad Fort) दिसत होता. इरशाळगडाचा ट्रेक चौक जवळील मणिवली ह्या गावातून मी केलेला आहे. सोंडाई किल्ला, माथेरान, प्रबळगड आणि इरशाळगडाच्या मधोमध मोरबे धरणाचा (Morbe Dam) जलाशय आहे.
आता गडाच्या दक्षिणेकडे पाहत होतो. खालून जाणारा कर्जत - खोपोली मार्ग व थोडे पूर्वेकडे बघत गेल्यावर घाटातील नागफणीचा डोंगर (Dukes Nose) दिसत होता व हा ट्रेक पायथ्याच्या कुरवंडे गावातून करता येतो. तेथेच खंडाळा घाट मार्ग आहे.
आता किल्ल्याच्या पूर्वेकडील दृश्य पाहण्यासाठी आम्ही निघालो. तेथून राजमाची किल्ले दिसतात. जाताना आणखी एक सुकलेली पाण्याची टाकी पाहिली.
|
पाण्याची टाकी |
गडाच्या पूर्वेकडून मनरंजन व श्रीवर्धन किल्ले (Manranjan Fort and Shrivardhan Fort) सहज नजरेस पडतात. हेच राजमाची किल्ले (Rajmachi Fort). किल्ल्याची तटबंदी देखील स्पष्ट दिसून येते. राजमाची ट्रेक कर्जत आणि लोणावळा मार्गे करता येतो. कर्जत मार्गातून ट्रेक करताना वाटेत कोंढाणे लेणी (Kondhane Caves) पाहता याव्यात म्हणून मी कर्जत मार्गाने हा ट्रेक केला आहे.
|
गडाच्या पूर्वेकडील दृश्य |
किल्ल्याच्या थोड उत्तरेला पाहत गेल्यावर कळकराय सुळक्यामुळे (Kalakrai Pinnacle) ढाक बहिरी ओळखता येतो व ह्याच डोंगररांगेत पुढे भिवगड किल्ला (Bhivgad Fort) आहे. ढाक बहिरी ट्रेक मी सांडशी गावातून केला आहे. भिवगड किल्ला ट्रेक मी वडप गावातून केला आहे. भिवगड किल्ल्याजवळील एका खिंडीपासून उजवीकडील मार्ग ढाक बहिरीला जातो तर डावीकडील मार्ग भिवगड किल्लाच्या गडमाथ्यावर जातो. भिवगड ते ढाक बहिरी (Bhivgad to Dhak Bahiri Range trek) हा रेंज ट्रेक देखील केला जातो.
किल्ला ते नेवाळी गाव
काही वेळ थांबून परतीच्या मार्गाला लागलो. कदाचितच मी अशी कुठली भटकंती केली असावी जेथून इतके किल्ले, सुळके मला पाहता आले. किल्ल्यावर जाताना, किल्ल्यावरून आणि परत येताना जे काही सुळके, किल्ले पाहिले, हा अनुभव फार अविस्मरणीय होता. परतीच्या प्रवासात सह्याद्रीचे पाहिलेले हे दृश्य पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होते.
जवळपास सव्वा तासाने पुन्हा वाडीत आलोत व नवरात्र उत्सव निमित्त बसवलेल्या देवीचे दर्शन घेऊन गोपीनाथ भाऊचे आभार मानले.
तसेच गावाजवळ उल्हास नदीत पोहण्याचा आनंद देखील घेतला. नदीच्या पाण्याचा स्पर्श होताच दिवसभराचा थकवा क्षणात निघून गेला.
|
उल्हास नदीत पोहण्याचा आनंद घेताना |
परतीचा प्रवास
पुन्हा कर्जत गाठले आणि कर्जत - चौक मार्गाने मुंबई - पुणे जुन्या महामार्गाला निघालो. महामार्गाला पोहचताच एका हॉटेलमध्ये मस्त जेवण करून पनवेल - वाशी असा प्रवास करत मुंबईला पोह्चलोत.
ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी सोनगिरी किल्ला येथे क्लिक करा.
रायगड जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी रायगड येथे क्लिक करा.
जय शिवराय
#songirifort #palasdarifort #palasdari #newali #karjat #raigad #SahyadriBhatkanti
1 Comments
Good working sir
ReplyDelete