मोरगिरी किल्ला | माहिती भटकंती | Morgiri Fort | Mahiti Bhatkanti | Jambhulne | Maval | Pune | Sahyadri Bhatkanti

माहिती भटकंती सिरीज - मोरगिरी किल्ला 

पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात कोरीगड, घनगड, तुंग किल्ला, तिकोना किल्ला, लोहगड आणि विसापूर किल्ला हे सर्वांच्या परिचयाचे किल्ले आहेत. तसेच या किल्ल्यांबरोबर "मोरगिरी" नावाचा एक अपरिचित किल्ला देखील आहे. किल्ल्याचे स्थान आणि त्यावरील अवशेष पाहता, हा किल्ला टेहळणीसाठी बांधला असावा.
 
मोरगिरी किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या उध्वस्त झालेल्या असल्याने एका ठिकाणी लोखंडी शिडी व दोन ठिकाणी अवघड कातळ टप्प्यांवर सुरक्षेसाठी रोप लावलेला आहे. जांभुळणे (Jambhulne village) हे मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव. गावापासून किल्ल्यावर जाण्यासाठी जवळपास दोन तास लागतात. किल्ल्याची उंची (Height of the Morgiri Fort) 3010 फूट एवढी असून शेवटच्या टप्प्यातील अवघड चढणामुळे ह्या किल्ल्याची ट्रेक श्रेणी मध्यम ते अवघड समजली जाते. 

गावाच्या मागे उजव्या आणि डाव्या बाजूला एकमेकांशी सलग्न असे डोंगर दिसतात. या दोन डोंगरांच्या मधील खिंडीतून डाव्या बाजूकडील डोंगरावर जाणारी मळलेली वाट आहे. डोंगर धारेवरून दाट झाडीतून पंधरा मिनिटे चढल्यावर आपण पठारावर पोहोचतो. पठार लांबलचक पसरलेले आहे. पठारावर पुढे डाव्या बाजूला एक डोंगर दिसतो. त्या डोंगराच्या शेवटी कातळटोपी घातलेला डोंगर म्हणजेच "मोरगिरी किल्ला". 

पठारावरून किल्ल्याच्या माथ्यावर फडकणारा भगवा झेंडा दिसतो. डोंगर डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत पठारावरून अर्धा तास चालल्यावर आपण मोरगिरीच्या कातळटोपी खाली येतो. इथून पुढील वाट उभ्या चढाची आहे. पहिल्या टप्प्यात दाट झाडीमुळे सावली आहे. हा टप्पा पार केल्यावर आपण किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी पोहोचतो. या ठिकाणी कातळात कोरलेल्या काही पायऱ्या आहेत व सुरक्षेसाठी रोप लावलेला आहे. पायऱ्यांनी वर चढून गेल्यावर समोरच पाण्याचे टाकं आहे आणि जवळच दुसरं एक टाकं आहे. यात मावळ प्रांतातील जागृत देवस्थान जाखमाता देवीचे ठाणे आहे. या टाक्याजवळच एक शिडी लावलेली आहे. शिडी चढून वर गेले की पुढे कातळात कोरलेल्या काही पायऱ्या चढून आपण गडावर पोहोचतो. गडाचा माथा लहान आहे. गड माथ्यावर भगवा लावण्यात आहे आणि पाण्याचे टाके देखील आहेत.

गडावरून दक्षिणेकडे पाहिले असता कोरीगड किल्ला (Korigad Fort) दिसतो तर पूर्वेला जवळच तुंग किल्ला (Tung Fort) आहे. तुंग किल्ल्याचे मागे पवना धरणाचा विस्तीर्ण जलाशय (Backwaters of Pavna Dam) दिसतो. त्यामागे पूर्वेला तिकोना किल्ला (Tikona Fort) तर थोडं उत्तरेकडे पाहत गेल्यावर लोहगड आणि विसापूर किल्ला (Lohgad and Visapur Fort) दिसतो.

ह्या सिरीजमधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी माहिती भटकंती येथे क्लिक करा.

पुणे जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी पुणे येथे क्लिक करा.

#MahitiBhatkanti #morgirifort #jambhulne #maval #pune #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu