श्री क्षेत्र तुळापूर | Tulapur Temples | छत्रपती संभाजी महाराज समाधी | Sambhaji Maharaj Samadhi | Dharmik Bhatkanti | Itihas Bhatkanti | Pune

धार्मिक भटकंती व इतिहास भटकंती सिरीज - श्री क्षेत्र तुळापूर आणि छत्रपती संभाजी महाराज समाधी

भीमा, भामा व इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले व स्वयंभू महादेवाची प्राचीन मंदिरे असलेले, श्री क्षेत्र तुळापूर (Shree Kshetra Tulapur). तसेच स्वराज्यासाठी ऐन तारुण्यात आपले जीवन अर्पण करणारे, छत्रपती संभाजी महाराज यांचे हे समाधी स्थळ (Chhatrapati Sambhaji Maharaj Samadhi) देखील आहे. 

tulapur sambhaji maharaj samadhi

श्री क्षेत्र तुळापूर येथील अद्भुत मंदिरे व छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या ऐतिहासिक घटनाक्रमाचा थोडक्यात आढावा, आपल्या "धार्मिक भटकंती" व "इतिहास भटकंती" या सिरीज मार्फत ह्या ब्लॉगमध्ये घेणार आहोत.

खराडी, पुणे ते तुळापूर प्रवास

2021 मध्ये दिवाळीनिमित्त मुंबईवरून खराडी, पुणे येथील माझ्या सासरवाडीस आलो होतो. लग्नानंतर, कोरोना लॉकडाऊनमुळे काही धार्मिक स्थळांना भेट द्यायचे राहिले होते. म्हणून आळंदीस निघालो. खराडी, पुणे येथून पुणे - नगर रोडने लोणीकंद येथे आलोत व तेथून डावीकडील मार्गाने आळंदीकडे निघालो. वाटेत श्री क्षेत्र तुळापूरला भेट देणार होतो. तुळापूर अगोदर फुलगाव येथे काही वेळ थांबलोत. येथे एक प्रचंड मोठे वृक्षाच्या दाट सावलीखाली फार छान वाटत होते. येथे माऊलीची, श्री दत्त, भगवान शंकराची पिंड व हनुमानाची मुर्त्या देखील आहेत. ऐन रोडला लागूनच हे ठिकाण आहे.
 
tulapur sambhaji maharaj samadhi
फुलगाव

काही वेळाने पुढील प्रवास लागलोत. फुलगाव पुढचे गाव म्हणजेच तुळापूर. पुणे स्थानकापासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र तुळापूर आहे. दिवाळीनिमित्त काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे येथे आयोजन केलेले होते. 

tulapur sambhaji maharaj samadhi
श्री क्षेत्र तुळापूर प्रवेशद्वार

छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान

तुळापूरचे अगोदरचे नाव "नागरगाव" व याच तुळापूर नगरीत एक दुर्दैवी प्रसंग घडला. ह्या महाराष्ट्राच्या मातीने जसे स्वराज्यातील आनंदाचे क्षण अनुभवले, तसेच दुःखाचा डोंगर ही अनुभवला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती, संभाजीराजेंची हत्या असाच एक दुर्दैवी दिवस.
 
tulapur sambhaji maharaj samadhi
छत्रपती संभाजी महाराज स्मारक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर, स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजेंनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला. स्वराज्याच्या शत्रूना अक्षरशः सळो की पळो केले. परंतु फेब्रुवारी, 1689 साली संभाजी महाराजांना मुघल बादशहा औरंगजेबाने, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व आधी नगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे व नंतर तुळापूर येथे आणले. तब्बल 40 दिवस त्यांचा प्रचंड छळ करून, येथेच अत्यंत हलाखिने 11 मार्च 1689 साली त्यांची निर्घृणपणे हत्या केली गेली. जवळच, नदीच्या काठावर वसलेल्या वढू बुद्रुक या गावात त्यांना अग्नी देण्यात आला. 

"आता आपल्याला स्वराज्य सहजपणे गिळता येईल" असे औरंगजेबाला वाटत होते. परंतु या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि त्यामुळेच औरंगजेबाला स्वराज्यावर संपूर्णपणे कधीही विजय मिळवता आला नाही. 

tulapur sambhaji maharaj samadhi
छत्रपती संभाजी महाराज समाधी

अशा या घटनाक्रमामुळे तुळापूर व वढू बुद्रुक (Vadhu Budruk) या दोन्ही गावात छत्रपती संभाजी महाराजांची समाधी स्थळ पाहायला मिळतात. अनेक हालअपेष्टा होऊनही त्यांनी शरणागती पत्करली नाही. महाराष्ट्रात त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस "बलिदान दिवस" म्हणून साजरा केला जातो तर या ठिकाणाला "बलिदान स्थळ" बोलले जाते. हे ठिकाण आजही आम्हा तरुणांसाठी शक्तीस्थळ आहे.

tulapur sambhaji maharaj samadhiश्री क्षेत्र तुळापूर

या ठिकाणाला इतिहासासोबतच धार्मिक महत्त्व व निसर्गाची जोड देखील लाभली आहे. त्यामुळेच ऐतिहासिक प्रसंग आठवून थक्क झालेला पर्यटक, येथील अद्भुत मंदिरे व त्रिवेणी संगम पाहून थोडा वेळ सुखावतो. आम्ही अगोदर संगमेश्वर मंदिराला (Sangameshwar temple) निघालो. भगवान महादेवाचे हे प्राचीन मंदिर. 

tulapur sambhaji maharaj samadhi
tulapur sambhaji maharaj samadhi
संगमेश्वर मंदिर

मंदिरातील खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. मंदिर गाभाऱ्यात जाण्याअगोदर श्री गणपती व विठ्ठल रखुमाईची दर्शन घेतले. मंदिर परिसरात श्री गणपती व हनुमानाचे छोटे मंदिर, तसेच उंच दीपमाळ देखील आहे. काही वेळ मंदिर परिसरात विसावलोत. 

tulapur sambhaji maharaj samadhi
tulapur sambhaji maharaj samadhi

आता भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर (Confluence of three rivers - Bhima, Bhama and Indrayani rivers) निघालो. बोटीने एक लहान सफर देखील या संगमावर आपण करू शकता. हे क्षेत्र काशी, गया व प्रयाग या तीर्थक्षेत्रांच्या बरोबरीचे मानले जाते.

tulapur sambhaji maharaj samadhi
tulapur sambhaji maharaj samadhi
त्रिवेणी संगम व तेथील मंदिरे

संगमाजवळ अन्य छोटी - मोठी बरीच मंदिरे पाहायला मिळतात. त्यापैकी श्री विष्णू महाबल्लाळेश्वर मंदिर (Shree Vishnu Mahaballaleshwar temple), श्री विष्णू - राम - रामेश्वर मंदिर, कोटेश्वर मंदिर (Koteshwar temple) ही विशेष उल्लेखनीय. 

tulapur sambhaji maharaj samadhi
श्री विष्णू महाबल्लाळेश्वर मंदिर

tulapur sambhaji maharaj samadhi
कोटेश्वर मंदिर

tulapur sambhaji maharaj samadhi
श्री विष्णू - राम - रामेश्वर मंदिर

त्याशिवाय शिवकालीन गणेश मंदिर, श्री अंबाजीमाता मंदिर, साईबाबा मंदिर, श्री शनी महाराज मंदिर व शितळाई देवी मंदिर ही देखील पाहायला मिळतात.

tulapur sambhaji maharaj samadhi
तुळापूर येथील अन्य मंदिरे

संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक तुळापूरला, येथील अद्भुत मंदिरे पाहण्यासाठी व छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला आदरांजली वाहण्यासाठी येत असतात.

आपल्याला ही संयुक्त धार्मिक व इतिहास भटकंती कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये जरूर कळवा.

या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी "धार्मिक भटकंती" व "इतिहास भटकंती" येथे क्लिक करा. 

ह्याच भटकंतीचा यूट्यूब व्हिडिओ पाहण्यासाठी श्री क्षेत्र तुळापूर येथे क्लिक करा. 

जय शिवराय

#tulapur #temples #sambhajimaharaj #samadhi #vadhubudruk #pune #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu