लखनऊ भटकंती - भाग पहिला
मुंबई ते लखनऊ प्रवास - मी पाहिलेले सह्याद्रीचे आसमानी रूप
जन्म व शिक्षण मुंबईतच झाले आणि नोकरीदेखील मुंबईतच करत होतो. पण फेब्रुवारी, 2022 मध्ये नोकरी निमित्त उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊला गेलो होतो. त्या वर्षीची माझी ही पहिलीच भटकंती. नोकरी करत वेळ भेटेल तसं लखनऊमधील काही पर्यटन स्थळांना भेट दिली होती. बडा इमामबाडा (Bara Imambara), रुमी दरवाजा, छोटा इमामबाडा व जवळील काही पर्यटन स्थळे, तसेच लखनऊमधील प्रसिद्ध प्राणी संग्रहालय, नवाब वाजिद अली शाह प्राणी उद्यान (Lucknow Zoo - Nawab Vajid Ali Shah) आणि 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामाची साक्ष देणाऱ्या ब्रिटिश रेसिडेन्सीला (British Residency) देखील भेट दिली. याच भारत भटकंतीचे ब्लॉग्स "लखनऊ भटकंती" या सिरीज मार्फत काही भागांमध्ये शेअर करत आहे.
मुंबई ते लखनऊ प्रवास
मुंबईमधील माझ्या राहत्या घरापासून, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाला निघालो. भटकंतीकारणाने अनेक वेळा महाराष्ट्राबाहेर गेलो होतो. पण नोकरीनिमित्त पहिल्यांदाच जात होतो. तसा बराच उत्सुक होतो मी. नवीन ठिकाणी जाणे, नवीन लोकांशी संवाद साधने, तेथील ऐतिहासिक, धार्मिक व अन्य पर्यटन स्थळांना भेट देणे, स्थानिकांची संस्कृती, कला, परंपरा जाणून घेणे, हे सर्व माझ्या आवडीचे आणि माझ्या भटकंतीस व्यापक रूप देणारे होते.
|
विमानतळाला काढलेला फोटो
|
खंत फक्त एकच होती, सह्याद्री. सह्याद्रीपासून दूर जात होतो. किती महिने किंवा वर्षांनी परत येईल याची खात्री नव्हती आणि तोपर्यंत सह्याद्रीत भटकता येणार नाही, हा विचार मनात आला ना की थोडा वेळ काहीच सुचत नव्हते. जबाबदारी आणि स्वप्न दोन्ही सोबत घेऊन चालणाऱ्या प्रत्येकाची हीच गोष्ट असावी.
|
विमानात चढताना |
बघता बघता विमानाने आकाशात भरारी घेतली. क्षणातच अरबी समुद्रावर होतो. विमान वळून उत्तर प्रदेशाकडे निघाले. जाता जाता का होईना, पण एकदा आपल्या सह्याद्रीचे दर्शन होणार होते, नजर फक्त सह्य शिखराचा, किल्ल्यांचा वेध घेत होती.
|
विमान आकाशात भरारी घेताना |
आणि तो क्षण आला. स्वप्नातही कल्पना केली नव्हती असे दृश्य पाहायला मिळाले. माथेरान डोंगररांगेजवळील अनेक किल्ले, सुळके नजरेत येत होते. जणूकाही ढगांमधून डोकं वर काढून ही सुळके आपला निरोप घेत आहेत. आयुष्यातील सुवर्णक्षण.
|
माथेरान डोंगररांगेतील किल्ले व सुळके |
सह्याद्रीचे हे आसमानी रूप मनात साठवून पुढील दोन तास निवांत झोपी गेलो. लखनऊमधील चौधरी चरण सिंघ विमानतळाला पोहोचलो.
लखनऊ येथील भटकंती
विमानतळापासून आधी मेट्रो व नंतर रिक्षाने काही दिवसांसाठी कंपनीने राहण्याची व्यवस्था केलेल्या हॉटेलला पोहोचलो.
|
कंपनीने राहण्याची व्यवस्था केलेले हॉटेल |
काही दिवसांनी टेडीपुलिया (Tedhipuliya) याठिकाणी भाड्याने खोली करून राहायला लागलो. एकटाच असल्याने कामातून वेळ भेटेल तसा, आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारायचो. अतिशय स्वस्त दरात इलेक्ट्रिक वाहनाने येथे प्रवास करता येतो. घराजवळच रोज सकाळी बाजार भरायचा.
|
टेडीपुलिया |
|
इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास |
|
सकाळी बाजार |
फेरफटका मारताना खाद्य भटकंती नेहमी करायचो. विशेष म्हणजे उत्तरप्रदेश, बिहार राज्यातील प्रसिद्ध असा "लिट्टी चोखा" (Litti Chokha) हा पदार्थ. अप्रतिम चव आणि 2-3 लिट्टीने आपले पोट भरून जाते.
|
लिट्टी बनवताना |
|
लिट्टी चोखा |
रस्त्याला लागून असलेल्या दुकानातील पदार्थांपासून ते हॉटेलमधील डिशेस पर्यंत काही ना काही नवीन अनुभव घेण्याचा प्रयत्न करत होतो.
|
लखनऊ येथे चव घेतलेले अन्य काही पदार्थ |
काही दिवसांनी लखनऊ येथील पहिली भटकंती म्हणजेच इमामबाडा व जवळील पर्यटन स्थळांना भेट दिली. त्याचा ब्लॉग वाचण्यासाठी इमामबाडा येथे क्लिक करा.
ह्या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी लखनऊ भटकंती येथे क्लिक करा.
जय शिवराय
#MumbaiToLucknow #LucknowBhatkanti #BharatBhatkanti #travel #blog #sahyadri #skyview #SahyadriBhatkanti
0 Comments