नाणेघाट जवळील डोंगररांगेतील किल्ले, शिखरे व घाट मार्ग | Naneghat Mountain Range - Treks, Forts, Pinnacles and Ghats | Geotags Bhatkanti | Sahyadri Bhatkanti

जियोटॅग भटकंती सिरीज - नाणेघाट जवळील डोंगररांगेतील किल्ले, शिखरे व घाट मार्ग

माझ्या लग्नानिमित्त मुंबई ते परभणी असा टेम्पोने प्रवास केला होता. सोबत वऱ्हाड पण होते. मुंबईवरून कल्याण - मुरबाड ओलांडले आणि मुरबाड तालुक्यातील टोकावडे (Tokavade village) ह्या गावाजवळ चहा नाश्तासाठी थांबलोत. अर्थातच समोर बरीच लांब सह्याद्री शिखरं दिसत होती. त्यात काही किल्ले, काही घाट तर काही सुळके. सिद्धगड किल्ल्यापासून ते माळशेज घाट, ह्यामधील बऱ्याच ठिकाणांचा मी शोध घेत होतो. हे सह्याद्रीचे रुप मोबाईल कॅमेऱ्यात न मावणारे. त्यामुळे नाणेघाट जवळील काही किल्ले, शिखरे व घाट ह्यांचा एक फोटो शेअर करत आहे. याच ठिकाणांची माहिती आपल्या "जियोटॅग भटकंती" ह्या सिरीज मार्फत या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. 


ह्या डोंगररांगेतील नानाचा अंगठा सुळका (Nanacha Anghuta Pinnacle) ओळखणे अगदी सोपे आणि त्यानंतर आजूबाजूचे किल्ले, शिखरे आपसूक आपल्याला कळायला लागतात. टोकावडे गावापासून काही अंतर पुढेच वैशाखरे (Naneghat Base village - Vaishakhare) हे गाव आहे. ह्या गावातून नाणेघाट ट्रेक करता येतो. नाणेघाट हा सातवाहन कालीन व्यापारी मार्ग (Ancient trade route of Saatvahan Era - Naneghat). जुन्नर आणि कोंकण ह्यांना जोडणारा हा घाट. ह्या व्यापारी घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले. त्यापैकी एक किल्ला आणि नाणेघाटाचा पाठीराखा म्हणजेच जीवधन किल्ला (Jivdhan Fort). पुणे येथून येणार असाल तर जुन्नर मधील घाटघर (Jivdhan Fort Base village - Ghatghar) पासून हा ट्रेक आपण करू शकतो. मुंबई - ठाणे मधील अनेक ट्रेकर, आधी नाणेघाट ट्रेक करतात आणि मग नाणेघाटातील गुहेत रात्र राहून जीवधन किल्ल्याला जातात. प्रस्तररोहकांचा अतंत्य आवडता सुळका म्हणजे जीवधन किल्ल्याजवळील वानरलिंगी सुळका (Vanarlingi Pinnacle - Jivdhan Fort). तो देखील अगदी स्पष्टपणे मला दिसत होता. जीवधन किल्ला व्यतिरिक्त जुन्नर मधील चावंड किल्ला किंवा प्रसन्नगड (Chavand Fort or Prasannagad Fort), निमगिरी किल्ला व हनुमंतगड (Nimgiri Fort and Hanumantgad Fort), हडसर किल्ला (Hadsar Fort) व शिवनेरी किल्ला (Shivneri Fort) ह्या किल्ल्याची निर्मिती देखील ह्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी झाली.

आणखीन उजवीकडे पाहत गेल्यास, नाणेघाट प्रमाणेच आणखीन एक घाट आपल्याला दिसून येतो. तो ओळखला जातो ते त्याच्या वी आकाराच्या दरीमुळे. हा घाट म्हणजेच दाऱ्या घाट (Darya Ghat - Junnar). अंबोली आणि पालू ह्या दोन गावांना हा जोडतो. तसे बरेच अपरिचित हे ठिकाण आहे. मोजक्याच लोकांना ठाऊक असावे. वर्षभर जरी कोणी येथे येत नसले तरी पावसाळ्यात येथे बऱ्याच भटक्यांची पाय वळतात. त्यामागील कारण म्हणजे येथील हंगामी धबधबा (Darya Ghat Waterfall) व निसर्गरम्य परिसर. जुन्नर मधील अंबोली गावातून आपण येथे जाऊ शकता. ह्या घाटाच्या अगदी जवळच ढाकोबा किल्ला (Dhakoba Fort) आहे आणि अंबोली गावातूनच (Dhakoba Fort Base village - Amboli) ह्या किल्ल्याचा ट्रेक केला जातो. 

ढाकोबा किल्ल्यापासून अगदी जवळील डोंगरात लपलेल्या गणपती गडद गुहा (Ganpati Gadad Caves trek) आहेत. मुरबाड मधील पालू गावाशेजारील सोनावले गावातून (Ganpati Gadad Base village - Sonavale) तो ट्रेक करता येतो. ह्या गुहा पांडवकालीन (Ganpati Gadad Caves of Pandava Era) असल्याचे सांगितले जाते. आणखीन उजवीकडे पाहत गेल्यास आहुपे घाट (Ahupe Ghat), गोरखगड, मच्छिंद्रगड आणि सिद्धगड (Gorakhgad, Machchindragad and Siddhagad Forts) ही ठिकाणे नजरेस पडतात. 

आता आपण पुन्हा नाणेघाटात जाऊया आणि डावीकडील काही किल्ले, घाट व शिखरे यांचा वेध घेऊया. नाणेघाटाच्या डावीकडे पाहिले असता वेगवेगळ्या उंचीचे बरेच शिखरे आपले लक्ष वेधून घेतात. ती म्हणजे वऱ्हाडी शिखरे (Varhadi Pinnacles). ह्या शिखरांच्या पायथ्याशी, ट्रेकर मंडळीसाठी एक आव्हान असलेला मोरोशीचा भैरवगड (Moroshi's Bhairavgad) आहे. महाराष्ट्रात भैरवगड नावाने अनेक किल्ले आहेत. त्यामुळे त्या त्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या नावावरून ह्या किल्ल्यांची नावे ठेवलेली आहेत. म्हणून, मोरोशी गाव पायथ्याशी (Bhairavgad Base village - Moroshi) असलेला हा मोरोशीचा भैरवगड. 

आणखीन डावीकडे पाहत गेल्यास आपण माळशेज घाटात (Malshej Ghat) पोहचतो. माळशेज घाट ओलांडला की आपल्याला सिंदोळा किल्ला (Sindola Fort) व पिंपळजोगा धरणाचा (Pimpal Joga Dam) विस्तीर्ण जलाशय दिसेल. तर घाटाच्या विरुद्ध बाजूस अहमदनगर जिल्हातील हरिश्चंद्रगड (Harishchandragad Fort), कोथळ्याचा भैरवगड (Kothale Bhairavgad Fort) आणि अकोले तालुक्यातील बऱ्याच किल्ल्यांची शृंखला आहे. 

ह्या सिरीजमधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी जियोटॅग भटकंती येथे क्लिक करा.

#GeotagsBhatkanti #naneghat #jivdhanfort #dhakobafort #bhairavgad #SahyadriBhatkanti
Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu