इमामबाडा व जवळील पर्यटन स्थळे | लखनऊ भटकंती - भाग दुसरा | बडा इमामबाडा | Bada Imambara | रुमी दरवाजा | Rumi Darwaza | Chhota Imambara | Sahyadri Bhatkanti

जन्म व शिक्षण मुंबईतच झाले आणि नोकरी देखील मुंबईतच करत होतो. पण फेब्रुवारी 2022 मध्ये नोकरी निमित्त उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊला गेलो होतो. त्या वर्षीची माझी ही पहिलीच भटकंती. नोकरी करत वेळ भेटेल तसं लखनऊ मधील काही पर्यटन स्थळांना भेट दिली होती. 

बडा इमामबाडा, रुमी दरवाजा, छोटा इमामबाडा व जवळील काही पर्यटन स्थळे, तसेच लखनऊ मधील प्रसिद्ध प्राणी संग्रहालय, नवाब वाजिद अली शाह प्राणी उद्यान आणि 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामाची साक्ष देणाऱ्या ब्रिटिश रेसिडेन्सीला देखील भेट दिली होती. ह्याच भारत भटकंतीचे ब्लॉग्स "लखनऊ भटकंती" सिरीज मार्फत काही भागांमध्ये शेअर करत आहे.
 
भाग दुसरा - इमामबाडा व जवळील पर्यटन स्थळे

bada imambara

"नवाबो का शहर" म्हणून ओळखली जाणारी लखनऊ नगरी. येथे आल्यापासून भटकंती करण्यास अत्यंत उत्सुक होतो मी. ऐतिहासिक पर्यटन स्थळे ही नेहमीच माझ्या आवडीची. म्हणून येथील पहिली भटकंती म्हणजेच इमामबाडा व जवळील पर्यटन स्थळांना भेट दिली. संपूर्ण दिवसभराच्या या भटकंतीत बडा इमामबाडा व तेथील आसफी मशीद, शाही बाउली, भुलभुलैय्या, तसेच जवळील रुमी दरवाजा, क्लॉक टॉवर, पिक्चर गॅलरी व तेथील तळे, सतखंडा, छोटा इमामबाडा, गोमती नदीच्या तीरावरील कुडिया घाट, टीले वाली मशीद आणि गौतम बुद्ध पार्क, इत्यादी ठिकाणांना भेट दिली. त्याच भटकंतीचा हा ब्लॉग.
 

इमामबाडाला कसे पोहचावे! (How to reach Bada Imambara!)

टेडीपुलिया येथील राहत्या ठिकाणापासून इमामबाडाला निघालो. जवळपास 10 किमीचे हे अंतर. कामावरील माझे वरिष्ठ सहकारी इमामबाडाला सोडण्यासाठी माझ्यासोबत आले. इमामबाडाला येण्यासाठी लखनऊ (Nearest Railway Station - Lucknow) हे जवळील स्टेशन. लखनऊ स्थानकापासून 7 किमी अंतरावरच हे ठिकाण व तेथून सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देखील उपलब्ध आहे. गोमती नदीवरील (Gomti River) पूल ओलांडला आणि उजवीकडील मार्गाने इमामबाडाच्या दिशेने निघालो.

बडा इमामबाडा (Places to visit in Bada Imambara)

इमामबाडा परिसरात येताच उत्कृष्ट वास्तुकलेच्या भव्य इमारती आपल्या नजरेस येतात. भटकंतीची सुरुवात बडा इमामबाडा (Bada Imambada) पासून केली. 

bada imambara
इमामबाडा परिसर

बडा म्हणजे मोठा आणि इमामबाडा म्हणजे मुस्लिमांच्या आझादरीच्या उद्देशाने बांधलेले स्थान. अगदीच रोडला लागूनच बडा इमामबाडाचे भव्य प्रवेशद्वार आहे व त्याच्या विरुद्ध बाजूस नौबतखाना किंवा नक्कारखाना (Naubatkhana or Nakkarkhana) आहे. 

bada imambara
नौबतखाना / नक्कारखाना

बडा इमामबाडा येथे दोन प्रवेशद्वार आहेत. दोन्हीही अत्यंत भव्य व आखीव रेखीव. 

दोन्ही प्रवेशद्वार (आतील व बाहेरील बाजू)

पूर्ण परिसर फुलझाडांनी सुशोभीत केलेला आणि स्वच्छतेची उच्चोत्तम काळजी घेतलेली. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर एका बाजूस प्रचंड मोठी मशीद, मधोमध बडा इमामबाडाची मुख्य इमारत, तर दुसऱ्या बाजूस शाही बाउली आहे. येथील मशिदीला आसफी मशीद (Asafi Masjid), तर इमामबाडास आसफी इमामबाडा (Asafi Imambara) बोलले जाते. हे नाव पडले नवाब आसफ उद्दौला (Nawab Asaf-Ud-Daula) यांच्या स्मरणार्थ, ज्यांनी ही भव्य संरचना निर्माण केली व ज्याची रूपरेखा वास्तुविशारद किफायतुल्लाह (Architect Kifayatullah) यांनी बनवली आहे. 

bada imambara
आसफी इमामबाडा व मशीद

18 व्या शतकातील या वास्तुकलेला पूर्ण होण्यासाठी एका दशकाहून अधिकचा काळ लागला. या संरचनेची निर्मिती तत्कालीन अवधचे नवाब आसफ उद्दौला यांनी केली असून, त्यांचा उद्देश मुस्लिम समाजाच्या धार्मिक गरजांची पूर्तता व त्यावेळच्या विनाशकारी दुष्काळात लोकांना मदत करणे हा होता. असे म्हटले जाते की, काही लोक दिवसा ही वास्तू उभारण्याचे काम करत असत तर, काही लोक रात्रीच्या वेळी त्यादिवशी उभारलेली कोणतीही गोष्ट तोडण्यासाठी काम करत. दुष्काळाने पीडित लोकांसाठी रोजगार निर्मितीचा हा प्रयत्न. चुना, तसेच अन्य काही पदार्थ आणि लखोरी विटांपासून ही संरचना बांधलेली आहे.
 

बडा इमामबाडा - मुख्य इमारत (Bada Imambara - Main Building)

मुख्य इमारतीमध्ये तीन हॉल आहेत. या हॉलची नावे त्यांच्या छतावरील रचनेवरून ठेवण्यात आली आहेत. चिनी भांड्याच्या रचनेवरून चिनी हॉल (China Hall), इराणी ट्रेच्या रचनेवरून इराणी किंवा पर्शियन हॉल (Irani or Persian Hall), जो 160 फुटापेक्षा जास्त लांबीचा असून कुठल्याही आधाराशिवाय आजही सुस्थितीत आहे आणि खरबुजाच्या रचनेवरून भारतीय किंवा खरबूजा हॉल (Indian or Kharbuja Hall). 

bada imambara
मुख्य इमारतीमधील तीन हॉलची छते

मुख्य इमारतीमध्ये सिंहासन, महागडे झुमर, ताजिया (Tajiya), नवाब आसफ उद्दौला व त्यांची पत्नी यांची कबर, तसेच त्याकाळी प्रकाशाच्या सोयीसाठी वापरण्यात आलेले मेणबत्ती स्टॅन्ड व आरशे देखील आहेत.

bada imambara
सिंहासन व ताजिया

बडा इमामबाडा - भुलभुलैय्या (Labyrinth of Bada Imambara)

मुख्य इमारतीच्या वरच्या भागातील भुलभुलैय्या (Labyrinth of Bada Imambara) येथील प्रमुख आकर्षण आहे. एकसारखे दिसणारे अनेक मार्ग व दरवाजे. प्रत्येक ठिकाणी आपणास चार मार्ग मिळतील, ज्यापैकी फक्त एक बरोबर आणि अन्य तीन मार्ग चुकीचे असतात. त्यामुळे भुलभुलैय्या (Bhulbhulaiyya of Bada Imambara) मध्ये फिरायचे म्हटल्यास गाईड गरजेचा. 

bada imambara
भुलभुलैय्या

या भुलभुलैय्यामध्ये त्याकाळी संकटाच्या वेळी येथून निसटण्यासाठी गुप्त मार्ग देखील होते, जे सध्या बंद आहेत. या इमारतीची बनावटच अशी आहे की अगदी हळू आवाजात देखील संवाद साधता येतो. 

भुलभुलैय्या फिरून इमामबाडाच्या छतावर आलो. येथून लखनऊ शहराचे दृश्य नजरेस येते.

bada imambara
इमामबाडा छत

बडा इमामबाडा - शाही बाउली (Shahi Bauli of Bada Imambara)

आता शाही बाउली (Shahi Bauli of Bada Imambara) किंवा बावडी पाहण्यासाठी आलो. अनेक मजल्यांमध्ये बांधलेली ही शाही बाउली अतिशय उल्लेखनीय व त्याकाळी सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण होती. इमामबाडा परिसराच्या उभारणी दरम्यान शाही बाउली अगोदर बांधली गेली व ती थेट गोमती नदीशी जोडण्यात आली होती. येथील पाण्याचा उपयोग करून इमामबाडा परिसरातील अन्य वास्तू उभारण्यात आल्याचे सांगितले जाते. कालांतराने नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आणि त्यामुळे शाही बाउली सुकून गेल्याचे देखील बोलले जाते.

bada imambara
शाही बाउली

रुमी दरवाजा (Rumi Darwaza)

ज्यावेळी बडा इमामबाडासारखी भव्य संरचना उभा राहत होती, त्याच काळात नवाब आसफ उद्दौला यांनी इमामबाडाला लागूनच आणखीन एक वास्तू उभारली. ती म्हणजे जवळपास 60 फूट उंचीचा रुमी दरवाजा.

rumi darwaza
रुमी दरवाजा (समोरील बाजू)

महाकाय रचना, उत्कृष्ट डिझाईन आणि विलक्षण नाव. रोज हजारो लोक या दरवाजातून येणं जाणं करतात. काय अभिमान वाटत असेल ना त्यांना! अवध किंवा लखनवी स्थापत्य कलेचे उत्तम प्रतीक.

rumi darwaza
रुमी दरवाजा (मागील बाजू)

हुसेनाबाद क्लॉक टॉवर (Hussainabad Clock Tower)

थोडीशी विश्रांती करून जवळच असलेल्या हुसेनाबाद क्लॉक टॉवरकडे निघालो. अवधच्या संयुक्त प्रांताचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर सर जॉर्ज कूपर (Avadh State first Lieutenant Governor - Sir George Cooper) यांच्या आगमनानिमित्त 1881 मध्ये नवाब नसीर उद्दीन हैदर (Nawab Naseer-Ud-Din Haidar) यांनी क्लॉक टॉवर बांधले होते. हे भारतातील सर्व क्लॉक टॉवर्स मध्ये सर्वात उंच (Highest Clock Tower in India) म्हणून ओळखले जाते. रोस्केल पायने (Architect of Clock Tower - Roskell Payne) यांनी ही 67 मीटर उंचीची रचना तयार केली असून ती व्हिक्टोरियन आणि गॉथिक (Victorian and Gothic Architecture) या शैलीतील आहे. 

clock tower
क्लॉक टॉवर

घड्याळाचे भाग बनवण्यासाठी बंदुकी धातूचा (Gunmetal) वापर केला असून, घड्याळाचा डायल 12 पाकळ्यांच्या फुलाच्या आकारात आहे. इंग्रजाच्या कलात्मक आणि संरचनात्मक कौशल्याचे एक उत्तम उदाहरण. यास घंटा घर (Ghanta Ghar) असे देखील बोलले जाते.

पिक्चर गॅलरी व तळे (Picture Gallery and Lake)

क्लॉक टॉवर शेजारीच 19 व्या शतकात नवाब मोहम्मद अली शाह (Nawab Mohmmad Ali Shah) यांनी बांधलेली एक इमारत आहे. जी सध्या पिक्चर गॅलरी (Picture Gallery) म्हणून प्रसिद्ध आहे.

picture gallery
पिक्चर गॅलरी व तळे

या गॅलरीमध्ये अवधच्या नवाबांची पारंपारिक पोशाखातील उत्कृष्ट चित्रे (Drawings of Nawabs of Avadh) आहेत, जी त्याकाळच्या राजघराण्यातील संस्कृती व जीवनशैली दर्शवतात. इतिहास आणि कलाप्रेमींना भुरळ पाडणारे हे ठिकाण. गॅलरीच्या अगदी समोरच पायऱ्या असलेले तळे आहे.

picture gallery
अवधच्या नवाबांची पारंपारिक पोशाखातील चित्रे

सतखंडा (Satkhanda)

तळ्याशेजारीच चार मजल्यांची एक भव्य इमारत आपले लक्ष वेधून घेते. ती म्हणजे सतखंडा. नावावरून ही इमारत सात माळ्यांची असायला हवी असे वाटते. खरंतर ही इमारत अपूर्ण बांधलेली आहे. असे बोलले जाते की नवाब मोहम्मद अली शाह यांनी चंद्र पाहण्यासाठी ही इमारत उभारण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यू दरम्यान सतखंडाचे फक्त चार मजलेच उभा राहू शकले. त्यांच्या मृत्यूनंतर या इमारतीस अशुभ मानण्यात आले आणि त्यामुळे सतखंडाच्या उभारणीचे काम मात्र अपूर्णच राहिले.

satkhanda
सतखंडा

छोटा इमामबाडा किंवा हुसैनाबाद इमामबाडा (Chhota Imambara or Hussainabad Imambara)

आता नवाब मोहम्मद अली शाह यांनी बांधलेली सर्वोत्कृष्ट वास्तू पाहण्यासाठी निघालो. बडा इमामबाडा पासून एक किमी अंतरावर हे ठिकाण आहे. ते म्हणजे छोटा इमामबाडा किंवा हुसैनाबाद इमामबाडा. प्रवेशद्वारातून आत आल्यावर छोटा इमामबाडा परिसरातील अनेक वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. 

chota imambara
छोटा इमामबाडा प्रवेशद्वार

chota imambara
छोटा इमामबाडा परिसर

मी अगोदर शाही हमाम (Shahi Hammam) पाहण्यासाठी गेलो. हमाम म्हणजे स्नान करण्याची जागा. 

shahi hammam
शाही हमाम

इमामबाडा परिसराच्या मध्यभागी एक लहान तळे, तर अन्य परिसर फुलझाडांनी सजवलेला. ज्यामुळे हे ठिकाण आणखीन आकर्षक होते. 

chota imambara lake
तळे

एक लहान मशीद (Masjid at Chhota Imambara) व ताजमहलची प्रतिकृती असलेले मकबरा (Makbara at Chhota Imambara) देखील आपल्याला येथे पाहायला मिळते. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे सोनेरी घुमट व बाहेरील बाजूने सुंदर कॅलिग्राफी असलेली इमामबाडाची ही इमारत.

chota imambara
chota imambara
छोटा इमामबाडा, मकबरा व मशीद

बडा इमामबाडा प्रमाणेच या इमारतीमध्ये देखील सिंहासन, महागडे झुमर, ताजिया, मेणबत्ती स्टॅन्ड व आरशे आहेत. त्या व्यतिरिक्त नवाब मोहम्मद अली शाह व त्यांच्या आईची कबर देखील आहे.

chota imambara
सिंहासन, झुमर, ताजिया, कबर, मेणबत्ती स्टॅन्ड व आरशे

कुडिया घाट (Kudiya Ghat)

थोडा नाश्ता करून, गोमती नदीच्या तीरावरील कुडिया घाट परिसरात आलो. दिवसभर गजबजलेल्या ठिकाणांना भेट दिल्यावर, मला हवी असलेली शांती व मन प्रसन्न करणारे दृश्य येथे मिळाले. सूर्यास्ताला अजूनही दोन तासाचा अवधी होता. संध्याकाळ घालवण्यासाठी ही उत्तम जागा. 

kudiya ghat
कुडिया घाट

टीले वाली मशीद (Teele Wali Masjid)

पण अजूनही काही ठिकाणांना भेट देण्याचे राहिले होते. पुन्हा बडा इमामबाडा परिसरात आलो व तेथून जवळच असलेल्या टीले वाली मशीद या ठिकाणी निघालो. 

teele wali masjid
टीले वाली मशीद

गौतम बुद्ध पार्क (Gautam Buddha Park)

परतीच्या प्रवासाला लागण्याअगोदर गौतम बुद्ध पार्क या ठिकाणी देखील भेट दिली. आपल्या चिमुकल्यांसोबत वेळ घालवण्यासाठीचे हे उत्तम ठिकाण.

gautam buddha park
गौतम बुद्ध पार्क

दिवसभराच्या भटकंतीचा शेवट येथे करून मी परतीच्या मार्गाला लागलो. 

या सिरीज मधील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी लखनऊ भटकंती येथे क्लिक करा.

ह्याच भटकंतीचा युट्युब विडिओ पाहण्यासाठी इमामबाडा येथे क्लिक करा.

जय शिवराय

#badaimambara #rumidarwaza #chhotaimambara #picturegallery #clocktower #satkhanda #kudiyaghat #teelewalimasjid #LucknowBhatkanti #BharatBhatkanti #lucknow #uttarpradesh 

Reactions:

Post a Comment

0 Comments

Close Menu