गूगल मॅपच्या सेटेलाइट व्ह्यूचा उपयोग करून, ह्या सह्याद्रीमधील ट्रेकिंगची ठिकाणे, किल्ले, पर्यटन स्थळे यांचा आढावा आपण "Virtual Bhatkanti" ह्या सिरीज मार्फत घेतो. ह्या सह्याद्रीला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा हा एक लहानसा प्रयत्न. असाच एक, माथेरान डोंगररांगेचा सेटेलाइट व्ह्यू आपल्या सोबत शेअर केला आहे. ह्या रांगेत अनेक किल्ले, सुळके आणि ट्रेकिंगची ठिकाणे आहेत.
माथेरान (Matheran)
माथेरान हे प्रसिद्ध ठिकाण. हजारो पर्यटक येथे येत असतात, विशेषतः पावसाळ्यात. आपण थेट गाडी घेऊन माथेरानला जाऊ शकता. पण माथेरान मधील पॉइंट फिरण्यासाठी मात्र गाडी घेऊन जाता येत नाही. फक्त चालत किंवा घोडा, हेच आपल्याकडील पर्याय. तसेच माथेरान मधील काही पॉइंटला ट्रेक करून देखील जाता येते. जसे कि वन ट्री हिल ट्रेक (One Tree Hill Point trek), गार्बेट पॉईंट ट्रेक (Garbett Point trek), कड्यावरचा गणपती ट्रेक (Kadyavarcha Ganpati trek), इत्यादी.
पेब किल्ला किंवा विकटगड (Peb Fort or Vikatgad Fort)
माथेरान जवळच एक सुंदर किल्ला आहे. तो म्हणजे पेब किल्ला किंवा विकटगड. किल्ल्याच्या एका बाजूने माथेरान ट्रेन मार्ग (Peb fort trek via Matheran train route) तर दुसऱ्या बाजूला आनंदवाडी गावातून (Peb fort trek via Anandwadi village) ट्रेक मार्ग आहे. माथेरान ट्रेन मार्गाने येताना पॅनोरामा पॉईंटच्या पायथ्यापासून वळसा घालून आपण किल्ल्याला जातो.
सोंडाई किल्ला (Sondai Fort)
माथेरानच्या उत्तरेला पेब किल्ला तर दक्षिणेला जवळच सोंडाई किल्ला आहे. तसा हा किल्ला बराच अपरिचित. माथेरानला पर्यटकांची प्रचंड गर्दी पण ह्या किल्ल्याकडे मात्र पर्यटकांचे लक्ष वेधले जात नाही. सोंडेवाडी आणि वावर्ले (Wavarle village) ह्या गावातून ह्या किल्ल्याचा ट्रेक करता येतो. सोंडेवाडी (Sondai Fort trek via Sondewadi village) हे गाव थोडी उंचीवर असल्याने सहसा पर्यटक ह्या गावातूनच ट्रेक करतात.
नाखिंड (Nakhind Ridge trek)
पेब किल्ल्याच्या अगदी बाजूच्या डोंगरात नैसर्गिकरित्या तयार एक भौगोलिक रचना पाहायला मिळते. वर्षानुवर्ष हवेच्या खनन कार्यामुळे खडकाला पडणारे छिद्र. ज्याला नेढे (Nedhe - an naturally formed hole in the mountain) बोलले जाते. हे ठिकाण प्रसिद्ध आहे नाखिंड ह्या नावाने. पायथ्याच्या बेडीसगाव (Nakhind Ridge trek via Bedisgaon) येथून हा ट्रेक करता येतो. तसेच अर्ध्या मार्गात आपल्याला वाघिणीची वाडी हे गाव देखील लागते. ट्रेक सोपा जरी असला तरी वाघिणीची वाडी ते नाखिंड पर्यंतचा मार्ग (Waghinichi wadi to Nakhind ridge) अतिशय दाट जंगलातून जातो आणि पावसाळ्यात तर मार्गाचा अंदाज लावणे खूप अवघड.
इरशाळगड (Irshalgad Fort)
महाराष्ट्रात काही किल्ल्यांवर देखील नेढे सारखी भौगोलिक रचना आपण पाहिली असेल. राजगड आणि रतनगड येथील नेढे आपली परिचयाची असावी. तसेच माथेरान जवळील आणखी एक किल्ला, जो मोरबे धरणाला लागून आहे. तो म्हणजे इरशाळगड. ह्या गडावर देखील आपल्याला नेढे पाहायला मिळते.
चंदेरी किल्ला (Chanderi Fort)
आपल्या विशिष्ट आकारामुळे चंदेरी किल्ला आणि म्हैसमाळ डोंगर सहज ओळखू येतात. पायथ्याच्या चिंचावली (Chanderi Fort trek via Chinchavali village) गावातून चंदेरी किल्ल्याचा ट्रेक करता येतो. किल्ल्यावरील गुहा पर्यंत जाणे तसे सोपे आहे. परंतु किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj on the top of Chanderi fort) जाणे कठीण आहे. आपल्या सोबत रोप व काही उपकरणे असणे आवश्यक. किल्ल्याच्या पायथ्याशी गाढेश्वर तलाव (Camping at Gadeshwar Lake) देखील आहे, जे सध्या कॅम्पिंगसाठी प्रसिद्ध होत आहे.
ताहुली (Tahuli Peak)
ह्याच डोंगररांगेत पुढे पाहत गेल्यावर आपल्याला ताहुली शिखर, गणेश कार्तिक शिखर (Ganesh Kartik Pinnacle) आणि मलंगगड दिसतो. ताहुली शिखराचा ट्रेक पायथ्याच्या खुशिवली गावातून (Tahuli peak trek via Khushivali village) करता येतो जो अगदी ताहुली आणि मलंगगड ह्याच्या मध्ये आहे. ताहुलीला जाताना वाटेत आपल्याला गणेश कार्तिक शिखर लागतो. बारीक अंघुट्या सारखे दिसणारे हे शिखर गिर्यारोहकांना नक्कीच आकर्षित करते.
मलंगगड (Malanggad Fort)
धार्मिक महत्त्व असलेले मलंगगड येथे जाण्यासाठी अतिशय सोपा मार्ग. मलंगवाडी हे पायथ्याचे गाव (Malanggad Fort via Malangwadi village). तसा हा किल्ला तीन टप्प्यात विभागला आहे. पीर माची, सोन माची आणि बालेकिल्ला. पीर माची पर्यंत अनेक भाविक येतेच असतात. पण तेथून अर्धा तासाच्या ट्रेक करून सोन माचीला जाऊ शकता. इथपर्यंतचा प्रवास सोपा आहे. पण बालेकिल्ला गाठणे अवघड. त्यासाठी गिर्यारोहणाचे कौशल्य आणि त्यासाठीचे साहित्य गरजेचे.
कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड (Kalavantin Durg and Prabalgad Fort)
माझ्यासाठी हा ट्रेक अतिशय जवळचा. २०१७ साली कलावंतीण दुर्ग ट्रेक करून ह्या सह्याद्रीशी माझं नात जोडलं गेलं आणि ते हळूहळू घट्ट होत आहे. पायथ्याच्या ठाकूरवाडी गावातून कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड (Kalavantin Durg and Prabalgad Fort trek via Thakurwadi village) ह्या किल्ल्याचा ट्रेक करता येतो. गावातून आधी दोन्ही किल्ल्याच्या अगदीच पायथ्याशी असलेल्या प्रबळमाची ह्या गावात आपण येतो. खाण्यापिण्याची, राहण्याची सोय येथे आहे. तसेच आपण येथे कॅम्पिंग (Camping at Prabalmachi village) देखील करू शकता. कलावंतीण दुर्ग येथील कातीळकोरीव पायऱ्या अतिशय उल्लेखनीय आणि ह्या पायऱ्या चढून जाणे आणि कलावंतीण सुळका प्रबळगड येथून पाहणे म्हणजे स्वर्गसुख. प्रबळगड हा प्रचंड मोठा किल्ला. किल्ल्यावरील सर्व ठिकाणांना भेट द्यायची म्हटल तर बरीच पायपीट करावी लागते. विशेष म्हणजे दक्षिण टोकावरील काळा बुरुज येथे जाणे. येथून दिसणारे मोरबे धरण, माथेरान आणि इरशाळगड ह्यांचा नजारा अतिशय सुंदर.
0 Comments