प्रकार - गिरिदुर्ग
किल्ल्याची उंची (Height of the Fort)- 3010 फूट
ठिकाण - मावळ, पुणे
पायथ्याचे गाव - जांभुळणे
वेळ - 2 तास
ट्रेक श्रेणी (Trek Grade) - मध्यम ते कठीण
सहनशक्ती पातळी (Endurance Level) - मध्यम
जवळचे रेल्वे स्टेशन - लोणावळा
पुणे जिल्ह्याच्या लोणावळा परिसरात घनगड, कोरीगड, तिकोना, तुंग, लोहगड, विसापूर हे सर्वांच्या परिचयाचे किल्ले. याच किल्ल्यांबरोबर मोरगिरी नावाचा एक अपरिचित किल्ला देखील आहे. सुरुवातीला सहज सोपा वाटणारा ट्रेक शेवटच्या टप्प्यांमध्ये मात्र अवघड होत जातो. कधी घनदाट झाडीतून, कधी पठारावरून, तर कधी दरी काठावरून, तर कधी रोपच्या साह्याने, अशी ट्रेक प्रवासातील विविध टप्पे असणारा हा ट्रेक आम्हा भटक्यांसाठी मेजवानीच.
पुणे ते जांभुळणे प्रवास :
भल्या पहाटेच मी खराडी, पुणे येथून मुंबई पुणे जुन्या महामार्गाने लोणावळाला निघालो. माझे ट्रेक्कर मित्र मुंबई वरून येणार होते. काही कारणास्तव त्यांची बाईक बंद पडल्याने लोणावळा पोहचायला त्यांना उशीर होणार होता. म्हणून मी लोणावळा पोहचून मोरगिरी किल्ल्याच्या दिशेने निघालो. वाटेत लागणारे लोणावळा तलाव, भुशी धरण, लोणावळा पॉईंट्स (टायगर, लायन, शिवलिंग पॉईंट) ह्यांना भेट देऊन शिवलिंग पॉईंट जवळ बसलो. समोर नागफणी डोंगर, मोराडी सुळका, मृगगड किल्ला दिसत होते.
|
शिवलिंग पॉईंट येथून दिसणारे दृश्य |
काही वेळाने माझे मित्र आले आणि आम्ही घुसळखांब गावाकडे निघालो. घुसळखांब गावापासून सरळ मार्ग कोरीगड, घनगड किल्ल्यांकडे जातो, तर डावीकडील मार्ग मोरगिरी, तुंग या किल्ल्यांकडे. जांभुळणे (Base village for Morgiri Fort) हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले छोटेसे गाव.
|
जांभुळणे गाव |
मोरगिरी किल्ला ट्रेक (Morgiri Fort Trek) :
गावामागील डोंगरांच्या खिंडीतून गडाकडे मार्ग जातो. मार्ग पूर्णपणे ओळखू येईल असा असल्याने मार्ग चुकण्याची शक्यता नाही. तसेच मार्गदर्शवणाऱ्या पाट्या येथे जागोजागी लावण्यात आले आहेत. खिंडीतून थोडंसं वर चढून आल्यानंतर मार्ग डाव्या बाजूस पठाराकडे जातो.
पठार बरेच लांब पसरलेले आहे व समोरच कातळ टोपी असलेला डोंगर आमच्या नजरेस आला. हाच मोरगिरी किल्ला. किल्ल्यावरील भगवा आम्हाला दिसत होता.
|
पठार आणि मोरगिरी किल्ला |
पठारावरून जवळपास अर्धा तास चालून पुढे आल्यावर, डोंगर डाव्या बाजूस ठेवून, दरी काठावरून आम्ही जात होतो. थोड्यावेळाने मोरगिरी किल्ल्याच्या अगदीच पायथी येऊन पोहोचलो.
|
मोरगिरी किल्ला |
आता किल्ला चढण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीचा मार्ग मध्यम चढाचा आणि घनदाट झाडीतून असल्याने फारशी अडचण वाटली नाही. मात्र हळूहळू मार्ग उभ्या चढाचा होत होता आणि त्यात प्रखर ऊन व सरकती माती यामुळे अतिशय काळजीपूर्वक आम्ही चढाई करत होतो. किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या उध्वस्त झाल्या असल्यामुळे सुरक्षेसाठी दोन ठिकाणी रोप तर एका ठिकाणी शिडी लावण्यात आली आहे.
|
रोपच्या साहाय्याने चढाई करताना |
गडावर भेट देण्याची ठिकाणे (Places to visit on Morgiri Fort) :
किल्ल्याच्या कातळ भिंतीपाशी येताच काही पाण्याच्या टाक्या लागल्या. त्यापैकी शिडी जवळील टाक्याशेजारी जाखमाता देवीचे ठाणे (Jakhmata Devi Temple)आहे.
|
जाखमाता देवी |
शिडी चढून वर आलं की कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या आणि त्या चढून आम्ही गड माथ्यावर पोहोचलो. तब्बल 2 तासाने आम्ही गडावर होतो. गडमाथा अतिशय लहान असून काही पाण्याच्या टाक्या येथे पाहायला मिळतात. गडाचे स्थान व अवशेष पाहता हा किल्ला नक्कीच टेहाळणीसाठी बांधला असावा.
|
गडमाथ्यावरील पाण्याची टाकी |
किल्ल्याच्या दक्षिणेकडे पाहता कोरीगड किल्ला, अँबी व्हॅली सिटी नजरेस येते. पूर्वेकडे पाहत गेले कि तिकोना किल्ला, पवना धरणाचा जलाशय, तुंग किल्ला दिसतो. तसेच उत्तरेकडे पाहत गेले लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात. पण वातावरण स्वच्छ नसल्याने तिकोना, लोहगड, विसापूर हे किल्ले पाहता आले नाही.
|
कोरीगड आणि तुंग किल्ल्यांचे दृश्य |
परतीचा प्रवास :
प्रखर ऊन, सरकती माती यामुळे अगदी सावधानतेने आम्ही गड उतरू लागलो. काही वेळाने पठारावर पोहचलोत. काही काळ किल्ले पाहत आराम केला. अतिशय निवांत वाटत होते. वेळ सरूच नये असं काही तरी.
गडमाथ्यापासून पुन्हा जांभुळणे गावास पोहचण्यास आम्हाला दीड तास लागला त्यातला अर्धा तास आम्ही पठारावर घालवला होता. बाईक घेऊन पुन्हा लोणावळा आलोत, नाश्ता केला आणि मी पुण्याच्या दिशेने तर माझे मित्र मुंबईच्या दिशेने निघाले.
राहण्याची, खाण्यापिण्याची सोय (Accomodation/Food/Water availability) :
गडावर कुठलीही सोय नाही आणि ना वाटेत कुठे गावकऱ्यांकडून खाण्या किंवा पाण्याची सोय आहे. त्यामुळे सोबत पुरेसे पाणी आणि खाणे असणे गरजेचे.
मोरगिरी किल्ल्याला कसे जायचे? (How to reach Morgiri Fort) :
लोणावळा येथून भांबुर्डे गावाला जाणारी बस पकडून घुसळखांब गावी उतरावे. येथून डावीकडील मार्ग मोरगिरी, तुंग किल्ल्याकडे जातो. अगदीच 1 किमी अंतरावर जांभुळणे हे गाव आहे.
मुंबई ते जांभुळणे गाव - 100 किमी
पुणे ते जांभुळणे गाव (लोणावळा मार्गे) - 85 किमी
किल्ला भेटीचा योग्य हंगाम (Best time to visit Morgiri Fort) :
ऑक्टोबर अखेर ते एप्रिल
पुणे जिल्ह्यातील अन्य ब्लॉग वाचण्यासाठी पुणे येथे क्लिक करा.
#morgirifort #morgirikilla #jambhulne #lonavala #maval #pune #SahyadriBhatkanti
0 Comments